Pune Crime News | अमेरिकेहून मुले आल्याने त्यांना वाटणी करण्यासाठी बँकेच्या लॉकरमधून आणलेले 60 लाखांचे दागिने गेले चोरीला; देखभाल करणाऱ्या 4 महिलांवर संशय
पुणे : Pune Crime News | अमेरिकेत राहणारी मुले भारतात आल्याने वयोवृद्ध आईची आपल्याकडील सोने नाणे हे तिघा भावांमध्ये वाटणी करण्याची इच्छा होती. त्यामुळे बँकेच्या लॉकरमध्ये असलेले आजच्या बाजाराभावानुसार ६० लाखांहून अधिक किंमत असलेले ४७ तोळे सोन्याचे दागिने व एक हिर्याचा नेकलेस काढून कपाटात ठेवले होते़ ते चोरीला गेल्याचे दिसून आले. ८२ वर्षाच्या आईची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या चार महिलांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. अनिल रामचंद्र गुप्ता (वय ६१, रा. कुमार प्रिन्स टाऊन, रॉयल, उंड्री) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सॅलीसबरी पार्क येथील गिडनी पार्क येथील पुजा अपार्टमेंटमध्ये ऑक्टोंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली आहे. पोलिसांनी आरती, कविता, दिपाली, मनिषा या वेगवेगळ्या वेळी त्यांच्याकडे कामाला असलेल्या महिलांवर संशयित म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल गुप्ता हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे दोन भाऊ अमेरिकेत राहण्यास आहेत. त्यांची आई सुनिती गुप्ता (वय ८२) या मागील २ वर्षांपासून अमेरिकेमध्ये राहण्यास होत्या. १९ जून २०२५ मध्ये त्या भारतामध्ये परत आल्या. सॅलीसबरी पार्कमधील फ्लॅटमध्ये त्या एकट्याच रहातात. त्यांची देखभाल करण्याकरीता सरीता एजन्सी आरती ही नेपाळी महिला १० जून २०२५ पासून त्यांच्याकडे नोकरीला होती. त्यांचे दोन्ही भाऊ भारतात आले असल्याने सुनिता गुप्ता यांनी इच्छा होती की त्यांच्याकडील सर्व सोने नाणे हे तीन भावामध्ये वाटून द्यावे. दिवाळीपूर्वी ऑक्टोंबर २०२५ मध्ये त्यांनी बँकेच्या लॉकरमधून हे दागिने आणून सॅलीसबरी पार्कमधील फ्लॅटच्या कपाटात ठेवले. कपाट लॉक करुन त्याची चावी त्यांनी आईकडे दिली. काही कारणास्तव हे दागिने तीन भावांमध्ये वाटून देण्याचे राहिले. त्यांच्या आईने हे सोन्याचे व हिर्याचे दागिने पुन्हा लॉकरमध्ये ठेवण्यासाठी सांगितले होते. परंतु, अनावधानाने ते लॉकरमध्ये ठेवण्याचे राहुन गेले.
त्यांच्याकडे कामाला असलेली नेपाळी महिला १८ ऑक्टोंबर रोजी अचानक आजीची तब्येत ठीक नसल्याचे सांगून नेपाळला निघून गेली. त्यानंतर खुशी एजन्सीमधून १९ ऑक्टोंबर २०२५ पासून कविता या महिलेला आईच्या देखभालीकरीता नोकरीला ठेवले होते. परंतु, आईच्या घरामध्ये ती पाय घसरुन पडल्यामुळे तिच्या पायाला लागले व ती २५ ऑक्टोंबर २०२५ रोजी काम सोडून निघून गेली. त्यानंतर खुशी एजन्सीकडून दिपाली या महिलेला नोकरीवर ठेवण्यात आले. परंतु, तिचे आणि आईचे पटले नाही़ ती काम व्यवस्थित करत नसल्यामुळे ५ नोव्हेंबर २०२५ रोजी तिला कामावरुन काढून टाकण्यात आले.
५ नोव्हेंबर २०२५ पासून मनिषा ही महिला त्यांच्याकडे कामाला येत आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी कपाट उघडले असता त्यात त्यांनी ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाही. त्यांच्या घरात कामाला असलेले या चार महिलांशिवाय कोणी आले नाही. कपाटाची चावी त्यांची आई नेहमी उशीखाली ठेवत असते. या दागिन्यांमध्ये १८ तोळ्यांच्या सोन्याच्या १२ बांगड्या, २४ तोळ्यांचे सोन्याचे ३ नेकलेस, ५ तोळ्यांचे सोन्याचे ५ जोड एअररिंग असे ४८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व विकत घेतला तेव्हा १ लाख रुपयांचा असलेला हिर्यांचा नेकलेस असा किमान ६० लाख रुपयांचा (आजच्या बाजारभावानुसार) ऐवज चोरीला गेला आहे.
ऑक्टोंबर ते २३ नोव्हेंबर या दरम्यान त्यांच्या आईच्या देखभालीसाठी ४ महिला नोकरीवर होत्या़ या चार महिलांपैकी कोणीतरी हे दागिने चोरले असल्याचा संशय डॉ़.गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुजारात जाधव तपास करीत आहेत.
