Retired DGP Praveen Dixit | बाह्यशक्तींचे पाकिस्तान हे भारताविरोधातील प्यादे ! भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील – प्रवीण दीक्षित
पुणे : Retired DGP Praveen Dixit | “भारताच्या सुरक्षेपुढे आव्हान निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन यासह अन्य काही शक्तीशाली देश प्रयत्नशील आहेत. भारताचे तुकडे करणे, भारताला अंतर्गत गोष्टीत गुंतवून ठेवणे, यासाठी त्या शक्ती पाकिस्तानचा वापर करत आहेत. पाकिस्तान हे एक प्यादे आहेत. पाकिस्तानचा वापर केला जातो,” असे मत राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत सुरू असलेल्या लिट फेस्टमध्ये मंगळवारी ‘राष्ट्रीय सुरक्षेसमोरचे धोके’ या विषयावर विशेष मुलाखत कार्यक्रम झाला. ज्येष्ठ सुरक्षा विश्लेषक व माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर आणि माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी या सत्रात सहभाग घेतला. योगेश परळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी उमराणीकर आणि दक्षित यांचे स्वागत केले.
दीक्षित म्हणाले, “पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे. भारतातही असंख्य मुस्लिम आहेत. त्यामुळे या बाह्यशक्ती पाकिस्तानच्या माध्यमातून व्हिक्टीम कार्ड वापरून भारतात मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार होतो, अशी ओरड करून वातावरण दूषित केले जाते.”
उमराणीकर म्हणाले, “सुरक्षेबाबत आपल्याला कायमच जागरूक राहावे लागणार आहे. दिल्ली बॉम्ब स्फोट झाला. त्याच्या आधी गुप्तचर यंत्रणांनी प्रचंड मोठा कट उधळून लावला. तीन हजार किलो स्फोटके जप्त केली. हे गुप्तचर यंत्रणांचे मोठे यश होते.”
या मुलाखतीत देशासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सीमाभागातील तणाव, दहशतवाद, सायबर गुन्हे, तसेच अंतर्गत सुरक्षेतील बदलते स्वरूप यावर वक्त्यांनी आपले विचार मांडले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी केवळ यंत्रणा नव्हे, तर सजग नागरिकत्त्वही महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संवादक योगेश परळे यांनी मुद्देसूद प्रश्नांच्या माध्यमातून चर्चेला दिशा दिली.
प्रवीण दीक्षित म्हणाले, “जन सुरक्षा कायदा हा समाजातील गंभीर आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आहे. मात्र, हा कायदा अतिशय जबाबदारीने आणि मर्यादित वापरासाठीच लागू केला गेला पाहिजे. कायद्याचा गैरवापर टाळणे, नागरिकांचे मूलभूत हक्क अबाधित ठेवणे आणि कारवाई पारदर्शक असणे अत्यावश्यक आहे.”
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची २० ठिकाणे नेस्तनाबूत – उमराणीकर
“पाकिस्तानातील जवळपास २० ठिकाणे नेस्तनाबूत केली. त्यात दहशतवादी तळे आणि वायूदलाच्या ठिकाणांचा समावेश होता. जागतिक अभ्यासकांनीदेखील ही गोष्ट अधोरेखित केली आहे. मात्र, पाकिस्तानने भारताची चार विमाने पाडली, हे त्यांचे नॅरेटिव्ह असून, ते सर्व ठिकाणी उचलले जाते. आपले नॅरेटिव्ह उचलले जात नाही. पाकिस्तान १९५५ पासून अमेरिका आणि ब्रिटिशांसोबत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे नॅरेटिव्ह उचलले जाते,” असे मत जयंत उमराणीकर यांनी यावेळी वव्यक्त केले.
