Pune Crime News | पुणे : ‘तिच्या’शी काय बोलत होता, असे विचारुन टोळक्याने युवकाला डोक्यात मारुन केले जखमी; खडक पोलिसांनी तिघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | अल्पवयातील मुलांमध्ये मुलींवरुन होणार्या भांडणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसू लागली आहे. आपल्या आवडणार्या मुलीशी कोणी बोलत असेल तर मित्रांच्या मदतीने त्या मुलाला बेदम मारहाण करण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. तिच्याशी काय बोलला हे समजून घेण्यासाठी टोळक्याने १७ वर्षाच्या मुलाला अडविले. प्रत्यक्षात ती या युवकाला चिडवत होती. पण, हे सहन न होऊन टोळक्याने या युवकाच्या डोक्यात फायटरने मारहाण करुन जखमी केले आहे.
याबाबत लंकेश रितेश सांब्रे (वय १७, रा. गुरुवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदित्य चव्हाण (वय १९), समर्थ दोडके (वय १९), अमर अन्वर सय्यद Amar Anwar Sayyed (वय १९, रा. गुरुवार पेठ) यांना अटक केली आहे. ही घटना गुरुनानक हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचे स्काऊट ग्राऊंड बाहेर १६ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवक हा गुरुनानक हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. १६ डिसेंबर रोजी कॉलेजचा स्पोर्टस डे असल्याने तो मित्रांबरोबर स्काऊट ग्राऊंड येथील कार्यक्रम संपल्यावर बाहेर आला. तेथे अमर सय्यद याने अडवून गाडीची चावी काढून घेतली. त्याने कोणालातरी फोन केला व सांगितले की, बॅनरजवळ बसलेला त्याला धरलेले आहे.
त्यानंतर समोरुन आदित्य चव्हाण, समर्थ दोडके आणि हितेश हे आले. ते लंकेश याला बाजूला चल असे म्हणाले, तेव्हा तो काय बोलायचे ते इथेच बोल, असे म्हणाला. त्यावर तो म्हणाला की, तू तिच्याशी काय बोलत होता ते सांग, त्यावर फिर्यादी याने ती मला चिडवत होती, असे म्हणताच समर्थ याने त्याच्या कानशिलात मारली. आदित्य चव्हाण याने हातातील फायटर डोक्यात मारुन जखमी करुन बघून घेण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याचे पाहून ते पळून गेले. पोलीस हवालदार येलपले तपास करीत आहेत.
