Pune Crime News | प्रियकरानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन बनविले आई; प्रियकराला वाचविण्यासाठी आईने मुलीचा बनावट जन्म दाखला देऊन डॉक्टर, पोलिसांची केली फसवणुक, निनावी फोन वरुन दीड वर्षानंतर प्रकरण उघडकीस
पुणे : Pune Crime News | काळेपडळ येथे एक मुलगी तिच्या बाळासह रहात असून ती अल्पवयीन असताना तिने बाळाला जन्म दिल्याचा निनावी फोन पोलिसांना आला. त्यावरुन एक धक्कादायक प्रकार तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आला. प्रेयसीच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकरानेच लैंगिक अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती राहिली. प्रियकराला वाचविण्यासाठी आईने आपल्या मुलीचा सज्ञान असल्याचा बनावट जन्म दाखला ससून रुग्णालयात सादर केल्याचे वास्तव समोर आले. काळेपडळ पोलिसांनी हा प्रियकर व पिडित मुलीच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत काळेपडळ पोलिसांनी चेतन सूर्यकांत आरणे Chetan Suryakant Arane (वय २५, रा. प्रगतीनगर, हडपसर) आणि पिडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०२३ ते २०२४ दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर रोजी नियंत्रण कक्ष येऊन फोन आला. एक मुलगी आपल्या मुलासह रहात असून ती अल्पवयीन असल्याचे निनावी फोनद्वारे कळविण्यात आले. या निनावी फोनवरुन दिलेल्या माहितीवरुन काळेपडळ पोलिसांनी तपास केला.
चेतन आरणे हा या पिडित मुलीसह तिच्या आईबरोबर रहात आहे. त्यावेळी त्याने या अल्पवयीन मुलीबरोबर शारीरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती झाली. ही १५ वर्षाची मुलगी एप्रिल २०२४ रोजी ससून रुग्णालयात प्रसुत झाली होती. त्यावेळी त्यांनी ती अल्पवयीन नसल्याबाबत नागपूर महानगर पालिकेचा पिडित मुलीचा जन्म दाखला ससून रुग्णालयातील डॉक्टरांना दाखवला होता. पोलिसांनी हा जन्म दाखला तपासला, तेव्हा तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या आईने व चेतन आरणे याने बनावट दाखला दाखवून डॉक्टर व पोलिसांची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील तपास करीत आहेत.
