Jitendra Dudi Pune Collector | नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Jitendra Dudi Pune Collector | Entire system ready for general elections of Municipal Council, Nagar Panchayat - District Collector Jitendra Dudi

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे : Jitendra Dudi Pune Collector | राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा करताना मतदान अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये जबाबदारीने बजाविण्याबाबत सूचना दिल्या आहेत; पात्र मतदारांनी निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, संपूर्ण निवडणुकीच्या कामकाजाकरिता संपूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यानुसार शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यामध्ये बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेकरिता पूर्ण निवडणूक तर लोणावळा, तळेगाव दाभाडे व दौंड या नगरपरिषदेच्या काही प्रभागांचा समावेश आहे.

या निवडणुकीत अध्यक्ष पदाकरिता बारामतीमध्ये १४ उमेदवार तसेच फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद येथे ७ उमेदवार आहेत. तसेच बारामती येथील ४१ जागांकरिता १५५ उमेदवार, फुरसुंगी-उरुळी देवाची येथील ३२ जागांसाठी १२० उमेदवार, दौंड येथील एका जागेसाठी (प्रभाग क्र.९ अ) ३ उमेदवार, लोणावळा येथील २ जागांसाठी (प्रभाग क्र. ५ ब व १० अ) ५ उमेदवार आणि तळेगाव दाभाडे येथील ५ जागांसाठी (२ अ, ८ अ, ८ ब, ७ ब व १० ब) १२ उमेदवार आहेत.

मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० असून आयोगाच्या निर्देशानुसार मतदानापुर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे, निवडणुकीच्या प्रचार आज १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता समाप्त होणार असून त्यानंतर प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, ध्वनिक्षेपक आदींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही. तसेच नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे २० डिसेंबर २०२५ रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत.

जिल्ह्यातील २ नगरपरिषदेकरिता पूर्ण निवडणूक व ३ नगरपरिषदेच्या काही प्रभागाची निवडणूक मिळून एकूण २३१ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये एकूण २ लाख १२ हजार ३९६ मतदार (पुरुष-१ लाख ८ हजार ३१० तर महिला १ लाख ४ हजार ५६ व इतर ३०) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात १९ डिसेंबर २०२५ च्या अधिसूचनेद्वारे शासनाने २० डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सु‌ट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सु‌ट्टी मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना सु‌द्धा लागू राहील. व नगरपरिषद,नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय, निम्न शासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम बँका आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आदी अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून एकूण १ हजार ४२५ अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर कार्यरत असणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलींग पार्टी सर्व साहित्यासहित आपआपल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या असून मतदान प्रक्रियेसाठी सुसज्ज आहेत. २ डिसेंबर रोजी झालेल्या व २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे, असेही श्री. डुडी म्हणाले.

You may have missed