Pune Crime News | एकतर्फी प्रेमातून पहिल्या प्रियकराने प्रेयसीच्या पतीला दारु पाजून अन् कोयत्याने सपासप वार करुन केला खुन
पुणे : Pune Crime News | त्याचे एकतर्फी प्रेम असताना तिने दुसर्याबरोबर लग्न केल्याने संतापलेल्या प्रियकराने तिच्या पतीला बोलावून घेऊन दारु पाजून अल्पवयीन मुलाच्या मदतीने कोयत्याने वार करुन खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिन्याच्या आत आपल्या प्रेयसीचे कुंकु हिरावून घेतल्याची घटना पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली.
दीपक गोरख जगताप (वय २२, रा. माळशिरस, ता. पुरंदर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुशांत संदीप मापारे Sushant Sandeep Mapare (वय २१, रा. माळशिरस, ता. पुरंदर, मुळ रा. पिंपळगाव, ता. दौंड) याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत जगताप याचे मामा संतोष रोहिदास शेंडकर (वय ४६, रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची बहिण सविता गोरख जगताप यांचा मुलगा दीपक गोरख जगताप हा आई वडिल, बहिणीसह राजेवाडी येथे रहात होता. दीपक जगताप हा उरुळी कांचन येथील यमाहा शोरुममध्ये कामाला होता. त्याचे पायल अमोल कांबळे (रा. वाघापूर, ता. पुरंदर) हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यांनी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी भिवरी येथील काळुबाई मंदिरात प्रेमविवाह केला. लग्नानंतर दीपक जगताप हे पायल हिच्यासह उरुळी कांचन येथे रहायला गेला. त्यांचा संसार सुरळीत सुरु असताना पायल हिचा पहिला प्रियकर सुशांत मापारे हा दीपक यांना मोबाईलवर कॉल, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम काूल करुन तुम्ही दोघांनी लग्न का केले. पायल ही माझ्याशी लग्न करणार होती, असा राग मनात धरुन जीवे मारण्याची धमकी देत होता. दीपक याने ही बाब घरच्यांना सांगितली होती.
१३ डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने दीपक पायल हिला घेऊन राजेवाडी येथे आला. पत्नीला घरी सोडले. सुशांत मापारे याचा सारखा फोन येतो, त्याला भेटून येतो, असे सांगून तो दुपारी मोटारसायकलवरुन गेला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो आला नाही. दीपक व सुशांत दोघांचेही फोन बंद लागत होते. दीपकचा शोध घेत असताना राजेवाडी गावाशेजारील माळशिरस येथील शेताचे शिवारात दीपकचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खुन केला होता. रक्ताळलेला कोयताही तेथेच पडला होता. दीपक हा सुशांत याला भेटायला गेला असल्याने त्यानेच खुन केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी जेजुरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. पळून गेलेल्या सुशांत मापरे याचा शोध सुरु होता. आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीचे आधारे सुशांत हा बाहेरील जिल्ह्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्या अनुषंगाने यवत येथे सापळा लावून सुशांत मापारे याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला. सुशांत मापारे याचे पायल हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती. परंतु, तिने दीपकशी लग्न केल्याच्या रागातून त्याने दीपकला दारु पिण्याचे निमित्ताने बोलावून अल्पवयीन मुलाच्या मदतीने त्याचा कोयत्याने वार करुन खुन केल्याची कबुली दिली. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सुशांत मापारे याच्यावर यापूर्वी विनयभंग व शरीराविरुद्धचा असे दोन गुन्हे दाखल असून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाईही करण्यात आली होती. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, महेश पाटील, नामदेव तारडे, सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार आण्णासाहेब देशमुख, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम, संदीप भापकर, हेमंत भोंगळे, कुंभार, जाधव, कोळेकर, कसेकर, अंमलदार सचिन घाडगे, अमोल शेडगे, मंगेश भगत, धीरज जाधव, राजू मोमीन यांनी केली आहे.
