BMC Election 2026 | मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज?, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबई : BMC Election 2026 | आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिलेश चित्रे यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकल्यास मोहित कंबोज यांना महापौरपदी बसवले जाईल, असा दावा त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रे यांनी भाजपवर मराठी महापौराबाबत स्पष्ट भूमिका न मांडल्याचा आरोप केला आहे. “भाजप नेते महापौर महायुतीचा किंवा हिंदू असेल असे सांगतात, मात्र तो मराठीच असेल असे ठामपणे कोणीही सांगत नाही,” असे म्हणत त्यांनी मोहित कंबोज यांचे नाव पुढे केले आहे. तसेच, स्वाभिमानी मराठी माणसाने याला विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या दाव्यानंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवण्याची शक्यता असून, भाजप आणि शिंदे गटात प्रामुख्याने जागावाटप होणार आहे. निवडणूक जिंकल्यास महापौर कोणाचा होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर “मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल,” असे सस्पेन्स कायम ठेवणारे विधान केले आहे.
