Pune Police MPDA Action | सराईत गुंडावर MPDA ची कारवाई, एक वर्षासाठी केले वर्धा कारागृहात स्थानबद्ध; सहकारनगर पोलिसांकडून वर्षभरात सर्वाधिक MPDA
पुणे : Pune Police MPDA Action | सहकारनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुंडावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन त्याला एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ऋषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे Rishikesh alias Barkya Sanjay Londhe (वय २६, रा. तळजाई वसाहत, पदमावती) असे या सराईत गुंडाचे नाव आहे. बारक्या लोंढे हा २०२३ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय आहे. त्याच्याविरुद्ध मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. घातक हत्यारे जवळ बाळगुन दरोडा घालणे, मनाई आदेशाचा भंग करुन दहशत निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, स्त्रीयांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने पाठलाग करणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणून त्यांच्यावर हल्ला करणे असे एकूण ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करुनही त्याच्या वागणूकीत काही एक फरक पडलेला नाही. त्याच्या दहशतीमुळे लोक तक्रार देण्यास समोर येत नाही. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शंकर पवार यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सादर केला आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाचे अवलोकन करुन बारक्या लोंढे याला एक वर्षासाठी वर्धा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार न्यायालयाच्या परवानगीने बारक्या लोंढे याला येरवडा कारागृहातून सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची वर्धा कारागृहात रवानगी केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, फिरोज शेख, पोलीस हवालदार विनायक एडके, अमोल पवार, पोलीस अंमलदार गोरख ढगे, हरिश्चंद्र चोरमले, मारोती नलवाड यांनी केली आहे.
