Pune Crime News | महिलेची जमीन बळकवण्याच्या खंडणीच्या गुन्ह्यात टिपू पठाण टोळीमधील फरार 2 गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने मुसक्या आवळल्या
पुणे : Pune Crime News | महिलेची जागा बळकावुन ती परत हवी असेल तर २५ लाखांची खंडणी मागणार्या टिपू पठाण टोळीतील १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर मोक्का कारवाई केली होती. टोळीतील २ गुन्हेगार गेली दोन महिने फरार होते. त्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
साजीद झिब्राइल नदाफ Sajid Jibril Nadaf (वय २७, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) आणि इरफान नासीर शेख Irfan Naseer Sheikh
(वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.
याबाबत लौरदेस हॅरीस स्वामी (वय ३१, रा. नौपाडा, मुंबई) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोंबर २०२५ रोजी फिर्याद दिली होती. त्यांची आई उर्सुला हॅरीस स्वामी हिची वारस हक्काने सय्यदनगर येथे १२९० चौरस फुट मिळकत नावे होती. त्या मिळकतीमध्ये तिने पत्र्याचे शेड बांधले होते. या जागेवर टिपू पठाण व त्याच्या टोळीने अतिक्रमण करुन पत्र्याची शेड पाडून टाकली. तेथे स्वत:चा बोर्ड लावला. आईच्या निधनानंतर फिर्यादी या जागेवर आले. तेव्हा टिपू पठाण याने जर तुम्हाला या मिळकतीचा ताबा पाहिजे असेल तर, तुम्ही २५ लाख रुपये द्या, अन्यथा मिळकत विसरुन जा आणि मुंबई येथे जेथे राहत आहे, तेथेच रहा़ या परिसरात पुन्हा दिसली तर परत जिवंत जाणार नाही, अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होते.
काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाण सह त्याच्या १३ साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून साजीद नदाफ व इरफान शेख हे फरार झाले होते. हे दोघे आपल्या घरी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वेताळबाबा वसाहत आणि सय्यदनगर येथून दोघांना ताब्यात घेतले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख, परमेश्वर कदम यांनी केली आहे.
