Pune Crime News | ‘‘तुझ्यामुळे पोलिसांचे राऊंड वाढले, माझी दारुची बाटली फोडतात’’; गुंडाने रिक्षाचालकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन केले जखमी
पुणे : Pune Crime News | रिक्षात दारु पित बसलेल्या दारुड्याने ‘‘तुझ्यामुळे पोलिसांची राऊंड वाढले, माझी दारुची बाटली फोडतात’’, असे म्हणून रिक्षाचालकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना घोरपडे पेठेतील सात नंबर कॉलनी येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत रिक्षाचालक प्रदिप लाला यादव (वय ३८, रा. घोरपडी पेठ, शंकरशेठ रोड) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुणाल सुरेश गुळुंजकर Kunal Suresh Gulunjkar (रा. सात नंंबर कॉलनी, घोरपडे पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी रात्री साडेनऊ वाजता अपोलो हॉस्पिटलच्या मागील गल्लीमध्ये आपली रिक्षा पार्क करुन घरी जात होते. त्याच गल्लीमध्ये कुणाल गुळुंजकर हा संदिप पवार यांच्या अॅटो गॅरेजमध्ये दारु पित बसला होता. प्रदिप यादव यांना पाहून तो म्हणाला, ‘‘तुझ्यामुळे येथे पोलिसांचा राऊंड वाढले आहेत. ते आले की माझी दारुची बाटली फोडतात. मी इथला भाई आहे, तु नीट रहा, पोलिसांना येथे बोलावत जाऊ नको.’’ त्यावर यादव म्हणाले की, निवडणुकीमुळे पोलिसांचे राऊंड वाढले आहेत. त्यात माझा काही संबंध नाही. तु येथे नको दारु पित बसू, जागा बदल, असे सांगितले. त्याचा त्याला राग आला. त्यावर त्याने विषय बदलून तू व तुझा मित्र माझ्या होणार्या बायकोला छेडता, म्हणून तुझ्यावर माझा राग आहे, असे म्हणाला. त्यावर यादव याने तू तिला समोर बोलाव, असे सांगितल्यावर त्याने तिला बोलावून घेतले. तिने आपल्याला कोणी छेडत नसल्याचे सांगितले.
त्यानंतर यादव हे घरी चालत जात असताना कुणाल हा पाठीमागून आले. तेथे पडलेली फरशीचा तुकडा डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. यादव खाली पडल्यावर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा त्यांची पत्नी, लहान भाऊ प्रितम हे भांडणे सोडविण्यासाठी आले. त्यांच्या पत्नीलाही कुणाल याने हाताने मारहाण केली. प्रितम यादव यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना कुणाल याने तुझी रिक्षा व तुझे घर जाळून, तुझे सर्व खानदान जाळून टाकतो, अशी धमकी दिली आहे. पोलीस हवालदार पंकज वणवे तपास करीत आहेत.
