MP Sanjay Raut | ‘भाजप आमदाराने कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी’; खासदार संजय राऊत  

MP Sanjay Raut | 'Rickshaw driver who was hit by BJP MLA is Marathi'; MP Sanjay Raut

मुंबई : MP Sanjay Raut | भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी रिक्षावाल्याला मारहाण केल्याच्या घटनेवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मारहाण झालेला रिक्षावाला मराठी असल्याचा दावा करत राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सोमवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “रिक्षावाल्याने नियम मोडला असेल, पण भाजपचे सरकार रोज नियम मोडत आहे. मुंबई नियमबाह्य पद्धतीने अदानीला दिली गेली. मग पराग शाह अदानींची कॉलर पकडण्याची हिंमत दाखवतील का? देवेंद्र फडणवीसांना मिठागार आणि धारावीची जमीन अदानींना दिल्याबाबत जाब विचारतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ही घटना घाटकोपर पूर्व भागातील वल्लभबाग लेन आणि खौगली परिसरात घडली. या भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथावरील अतिक्रमणाबाबत तक्रारी आल्याने आमदार पराग शाह शनिवारी पाहणीसाठी गेले होते. यावेळी महात्मा गांधी रोडवर एका रिक्षावाल्याने राँग साईडने रिक्षा चालवल्याचे दिसल्याने संतापलेल्या पराग शाह यांनी त्याला कानाखाली मारली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी आमदाराने कायदा हातात घेतल्याचा सवाल उपस्थित केला, तर काहींनी त्यांच्या कृतीचे समर्थन केले. मात्र, आता रिक्षावाला मराठी असल्याचा दावा पुढे आल्याने, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी–अमराठी वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You may have missed