Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; पुणे विभागातील 4 विशेष गाड्या फेब्रुवारी 2026 पर्यंत धावणार
पुणे : Pune Railway | Pune Railway | पुणे रेल्वे विभागातून प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या चार विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे संबंधित मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. या गाड्यांचा कालावधी डिसेंबर अखेरपर्यंत होता. मात्र, नववर्षातही प्रवाशांची गरज लक्षात घेऊन या विशेष गाड्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांचे मार्ग, वेळापत्रक, थांबे आणि डब्यांची रचना पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
दरम्यान, पुणे–कोल्हापूर आणि पुणे–लातूर मार्गावरील विशेष गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाही त्या अद्याप विशेष स्वरूपातच चालवण्यात येत आहेत. या गाड्या नियमित करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
कालावधी वाढवलेल्या विशेष गाड्या :
* गाडी क्रमांक 01461/01462 सोलापूर–दौंड–सोलापूर (अनारक्षित) ही दररोज धावणारी विशेष गाडी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
* गाडी क्रमांक 01023/01024 पुणे–कोल्हापूर–पुणे दररोज धावणाऱ्या विशेष गाडीचा कालावधीही 28 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आला आहे.
* गाडी क्रमांक 01487/01488 पुणे–हरंगुळ (लातूर)–पुणे दरम्यान दररोज धावणारी विशेष गाडी 26 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
* गाडी क्रमांक 01487/01488 हडपसर–हरंगुळ (लातूर)–हडपसर ही विशेष गाडी 27 जानेवारीपासून 28 फेब्रुवारी पर्यंत धावणार आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वे विभागाने रेल्वेच्या मुख्य 8 मार्गांवरसुद्धा वर्षाअखेर आणि नवीन वर्षानिमित्त विशेष गाड्या सुरू केल्या आहे. एकूण 244 विशेष गाड्यांची घोषणा केली गेली आहे. त्याचबरोबर, अतिरिक्त गाड्याही येत्या काही काळात सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर 76 तर पश्चिम रेल्वेवर 72 विशेष गाड्या सोडणार येणार असल्यामुळे, मुंबई आणि पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे.
