Surendra Pathare Foundation | सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंटची शिवनेरीवर ‘गडकिल्ले मोहीम’ यशस्वी

Surendra Pathare Foundation

जुन्नर (पुणे) : Surendra Pathare Foundation | शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गडकिल्ले मोहिमेचे चौथे पुष्प काल रविवार (दि. २१ डिसेंबर) रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडले. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” ही गर्जना करत मोठ्या संख्येने नागरिक शिवनेरीवर दाखल झाले. मोहिमेत 2173 नागरिक सहभागी होते, ज्यात महिला व लहान मुलांचाही सहभाग होता. स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष असलेली ही पवित्र भूमी पुन्हा एकदा शिवभक्तांनी भरून गेली.

किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे पावन झालेली शिवजन्मभूमी आहे. याच मातीमध्ये स्वराज्याची बीजे रोवली गेली, याच गडावर शिवाजी महाराजांचे बालपण घडले आणि याच ठिकाणी स्वराज्याच्या विचारांची पहिली जाणीव निर्माण झाली. त्यामुळे शिवनेरीला महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नुकताच किल्ले शिवनेरीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्याने या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाले आहे.

मोहिमेदरम्यान सहभागी नागरिकांनी शिवजन्मस्थळाचे तसेच शिवाई देवीचे दर्शन घेतले. गडावरील प्रत्येक पायरी, प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देत असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

या गडकिल्ले मोहिमेचा उद्देश गड संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, इतिहासाशी नाते पुन्हा जोडणे आणि पुढील पिढीपर्यंत स्वराज्याची प्रेरणा पोहोचवणे हा आहे, असे सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे व सखी प्रेरणा मंचाच्या अध्यक्षा ऐश्वर्या पठारे यांनी व्यक्त केले.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता हा उद्देश यशस्वी होत असल्याचे चित्र दिसून आले. मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. येणाऱ्या काळातही महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण आणि इतिहासाची जाणीव निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed