Chandrakant Patil | विरोधकांनी 60 वर्षांचा हिशोब द्यावा! केंद्र, राज्य आणि महापालिकेतील भाजप सरकारमुळे पुणे शहरात अनेक विकास कामे झाली- ना. चंद्रकांतदादा पाटील
पुणे : Chandrakant Patil | महापालिकेत २०१७ ते २०२१ काळात पाचच वर्षे भाजपचे सरकार होते. पण महाराष्ट्राची आणि महापालिकेच्या स्थापनेपासून विरोधी पक्षाचीच सत्ता होती, त्यामुळे विरोधकांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा, असा घणाघात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारच्या काळात पुणे शहरात अनेक विकास कामे झाल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.
कोथरुडमधील प्रभाग क्रमांक ३१ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. चंद्रकांतदादा पाटील यांची चौक सभा आज झाली. यावेळी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भाजप मध्य मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, प्रभाग क्रमांक ३१ चे भाजप उमेदवार पृथ्वीराज सुतार, ज्योत्स्ना कुलकर्णी, वासंती जाधव, दिनेश माथवड यांच्यासह भाजपचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले की, पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्ष २०१७ ते २०२१ या पाच वर्षाच्या काळातच भाजप सत्तेत होता. या काळात मेट्रोसह, समान पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात बसेसची उपलब्धता, नदीसुधार प्रकल्प, वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रमुख चौकांत उड्डाणपूल असे एक ना अनेक प्रकल्प राबवले. कोथरुड मध्ये घरापासून ते मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी बसेसची देखील व्यवस्था केली आहे.
ते पुढे म्हणाले की, आज विरोधक भाजपवर टीका करत आहेत की, भाजपच्या काळात विकास झालेला नाही. वास्तविक, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आणि पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून ६० वर्षे महापालिकेत तुमचीच सत्ता होती. तुमच्या काळात पुण्याची स्थिती काय होती, ज्यामुळे २०१४ पासून पुणेकरांनी तुम्हाला सातत्याने नाकारले आहे. तुमच्या काळात मंजूर झालेला आणि उभारलेला विद्यापीठ चौकात उभारलेला उड्डाणपूल पाडण्याची नामुष्की तुमच्यावर ओढावली. हे तुमचे पुणे शहराच्या विकासाचे नियोजन आहे का? असा घणाघात ना. पाटील यावेळी केला.
भाजपलाच मतदान करुन भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यावर परमहंसनगर आणि गुजरात कॅालनीमधील नागरिकांनी भाजपालाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
