Pune Crime Court News | गँगस्टर गजा मारणे याला महापालिका निवडणुक प्रचाराला येण्यास न्यायालयाने नाकारली परवानगी
पुणे : Pune Crime Court News | मोक्का गुन्ह्यात जामीन देताना पुणे शहरात येण्यास बंदी घालण्यात आलेला गँगस्टर गजा मारणे याचा पत्नीच्या प्रचारासाठी येण्यास केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
गजा मारणे यांची पत्नी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभी आहे. गजा मारणे सध्या त्याच्या मुळशीतील घरामध्ये रहात आहे. तेथूनच तो कोथरुडमधील लोकांना फोन करुन पत्नीला निवडणुकीत मदत करा, अशी फोनाफोनी करत आहे.
संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणात गजा मारणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणात गजा मारणे याला महापालिका निवडणुकीपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यात याला पुणे शहरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पत्नी जयश्री मारणे ही निवडणुकीला उभी आहे. तिला प्रचारात मदत करण्यासाठी पुणे शहरात येऊ द्यावे अशी मागणी करणारा अर्ज गजा मारणे याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. त्याला पोलिसांनी विरोध केला होता. गजा मारणे याला शहरात प्रवेश दिला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावताना त्याला मतदानासाठी त्या दिवशी व न्यायालयातील तारखांना हजर राहण्यासाठी पुणे शहरात येण्यास सवलत दिली आहे. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे अॅड़ विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.
पुण्यातील ६० उमेदवारांवर गंभीर गुन्हे
पुणे शहरातील विविध पक्षांच्या ६० उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांची यादी तयार केली आहे. चारित्र्य पडताळणीसाठी (कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट) दोन हजार ६५० जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी दीड हजार जणांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पडताळणीत मिळाली आहे. यामध्ये आंदोलन किंवा किरकोळ राजकीय गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी ६० उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. अशा उमेदवारांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे.
