Pune PMC Elections | पुणे महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होणार; मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास

Pune PMC Elections | BJP will be the mayor in Pune Municipal Corporation; Muralidhar Mohol firmly believes

पुणे : Pune PMC Elections |  “पुणे महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे,” असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०३ (विमाननगर-लोहगाव) येथे भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीच्या वतीने आयोजित परिवर्तन सभेत ते बोलत होते.

या सभेत व्यासपीठावर भाजप-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, अनिल दिलीप सातव, रामदास दत्तात्रय दाभाडे यांच्यासह व्यासपीठावर माजी आमदार जगदीश मुळीक, उत्तर जिल्हा प्रमुख प्रदिप कंद,  माजी नगरसेविका श्वेता गलांडे – खोसे, मंगेश गोळे,  राजेंद्र खांदवे, हनुमंत खांदवे, दिपक खांदवे, सोमनाथ खांदवे, सुनिल खांदवे, संतोष खांदवे, श्वेता काळे, महेश गलांडे, मीनाकाकी सातव, जयश्रीताई सातव, दगडू खांदवे, प्रमोद खांदवे, संदिप मोझे,  मोहनराव शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सभेपूर्वी उमेदवारांनी लोहगाव बस स्टॉप ते आझाद नगर मार्गे जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरापर्यंत पदयात्रा काढली. या पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

परिवर्तन सभेत भारतीय जनता पक्षाने नुकताच जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील प्रभाग क्रमांक ०३ साठीच्या ठोस विकासकामांची माहिती मांडण्यात आली. हा जाहीरनामा प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तयार केलेला वेळबद्ध व परिणामकारक विकासाचा रोडमॅप असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जाहीरनाम्यानुसार खडकवासला ते खराडी या नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार लोहगाव येथील पुणे विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे विमाननगर-लोहगाव परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना जलद सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच जांभूळवाडी, कात्रज, पाषाणसह लोहगाव येथील तलावांची स्वच्छता, सुशोभीकरण व पर्यावरणपूरक विकास करून पुणे शहराला ‘लेक सिटी’ म्हणून विकसित करण्याचा निर्धार जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.

याशिवाय पुणे विमानतळावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय जाहीरनाम्यात समाविष्ट असून यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक ओळखीला अधिक बळ मिळणार आहे.