Amol Balwadkar On Chandrakant Patil | पुणे : बरे झाले ‘त्यांनी’ भविष्यवाणी केली, ‘त्यांची’ भविष्यवाणी कधी खरी ठरली नाही; प्रभाग क्रमांक 09 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांचे चंद्रकांतदादा पाटील यांना प्रतिउत्तर (Video)
पुणे : Amol Balwadkar On Chandrakant Patil | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी चुकीचे उमेदवार दिल्याने पुण्यातील नेत्यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे त्यांना आता प्रभागात दारोदारी फिरवण्याची वेळ आली आहे. त्यांची कोणतीच भविष्यवाणी आजवर खरी ठरली नाही. त्यामुळे त्यांनी भविष्यवाणी केली, हे बरेच झाले. त्यामुळे माझा विजय निश्चित झाला असल्याचे सांगत प्रभाग क्रमांक ९ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना प्रतिउत्तर दिले आहे.
भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रभाग ९ मध्ये सध्या फिरत आहेत. त्यांनी येथून भाजपचेच उमेदवार निवडुन येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. त्याविषयी अमोल बालवडकर यांनी सांगितले की, परवाच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात काही प्रभागात चुकीचे उमेदवार दिल्याने त्यांची झाडाझडती घेतली. त्यांनी जर मला उमेदवारी दिली असती तर त्यांना असे दारोदारी फिरावे लागले नसते. असो आता तो विषय संपला आहे. आता त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरु आहे. त्यांच्या हातातून ही निवडणुक गेली आहे. चंद्रकांतदादा जेवढे फिरतील, तेवढे माझे मताधिक्य वाढणार आहे. त्यांना फक्त एकच विनंती आहे की, त्यांनी लोकांना चॉकलेट वाटू नये. उमेदवारांना पेढा चारु नये. ज्यांनी या भागात एकही विकास कामे केली नाहीत. जी काही कामे झाली आहेत, ती माननीय नरेंद्र मोदी आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेमधून झाली आहे. त्यांनी केलेली या भागातील विकास कामे दाखवावीत. ज्यांनी एकही विकास काम या भागात केले नाही, ते आता विकास कामावर बोलत आहेत.
त्यांच्याकडे या भागात दाखवायला काहीच नाही. स्वत: काही केले नाही आणि दुसर्याला करु द्यायचे नाही, त्या कार्यकर्त्यांना राजकारणात जीवंत ठेवायचे नाही, असे त्यांचे राजकारण राहिले आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा उघडा पडणार आहे.
चंद्रकांतदादा यांनी जे केले आहे, ते अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे. सर्व पुणेकर पाहताहेत. बालेवाडी, म्हाळुंगे, सुस, बाणेर, पाषाण, सोमेश्वरवाडी सर्व जण पहात आहेत.
प्रभाग क्रमांक ९ सुस बाणेर पाषाण भागात अमोल बालवडकर यांच्या भव्य पदयात्रा सुरु असून नागरिकांचा वाढता पाठिंबा त्यांना मिळत आहे. त्यांच्याबरोबर या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गायत्री मेढे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण यांचा एकत्रित प्रचाराचा झंझावात सर्वत्र सुरु आहे.
