Pune Crime News | शेअर मार्केटनंतर आता ऑनलाइन गेमचा फंडा; कॅश बँक, बोनसचे आमिष दाखवून कॉम्प्युटर इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी घातला 36 लाखांचा गंडा
पुणे : Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला छोटासा नफा देऊन विश्वास संपादन करुन लोकांना गुंतवणुकीच्या बहाण्याने कोट्यावधींची फसवणुक करणार्या घटना दररोज होत आहेत. अशात आता शेअर मार्केटप्रमाणेच ऑनलाइन गेममध्ये गुंतवणुक करायला सांगून फसवणुक करण्याचे प्रकार सुरु झाले आहे. वाघोली येथील एका ३० वर्षाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी ३६ लाख ७४ हजार रुपयांना गंडा घातला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एके दिवशी ई मेल आला. त्यात गुंतवणुकीच्या ५० टक्के फ्री कॅश बोनस मिळणार, दुसर्या मेलमध्ये गुंतवणुकीवर १५ हजार रुपये फ्री कॅश बोनस याबाबत माहिती आली होती. त्यांनी ‘परीमॅच’ या वेबसाईटवरुन गेम खेळून फिडबॅक दिल्यावर ५ हजार रुपये बोनस मिळेल, असा ई मेल आला. त्यावर त्यांनी माहिती भरली. वेबसाईटवर त्यांचे खाते लॉगिन करुन उघडल्यावर ‘फॉरचुन क्रिस्टल’ ही गेम सुरु झाली. त्यांना बरेच प्रमोशनल कॉल आले. त्यांनी ऑनलाईन गेम खेळण्यास सुरुवात केली असता तेथे मेनु बारमध्ये डिपॉझिट म्हणून एक बटन होते. त्यावर क्लीक करुन ते पैसे भरण्यास सांगायचे. त्यानुसार त्यांनी पैसे भरण्यासाठी क्लीक केले असता तेथून जी पे द्वारे त्यांच्या बँक खात्यातून पैसे त्यांनी दिलेल्या युपीआयवर जात असत. त्यांनी सुरुवातीला १० हजार रुपये गुंतवणुक करुन गेम खेळली असता त्यांना १९ हजार रुपये फायदा झाला. दोन्ही मिळून २९ हजार रुपये काढून घेतल्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी ७ बँक खात्यावरुन १७६ व्यवहार करुन एकूण ३६ लाख ७४ हजार ६५८ रुपयांची गुंतवणुक केली. त्यांनी जमा झालेल्या रक्कमेपैकी २ लाख रुपये विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथे वारंवार डिकलाईन झालेले दिसले.
त्यांनी या वेबसाईट बद्दल माहिती घेतली असता या बेवसाईटवर बरेच लोक फसलेले आहेत. ईडीने ११० कोटी रुपये या वेबसाईटशी जोडलेली संशयित बँक खाती फ्रीज केल्याची माहिती मिळाली. असे असतानाही त्यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचे पैसे विड्रॉल करण्यासाठी त्यांच्याकडील १८ हजार ५०० रुपये या वेबसाईटवर भरले व पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता पैसे विड्रॉल झाले नाही. त्यामुळे ‘परीमॅच’ या वेबसाईटवरुन फसवणुक झाल्याची फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करीत आहेत.
