Pune PMC Elections | विकास हाच विचार व विकास हीच दिशा; प्रभाग चारमध्ये भाजपाच्या उमदेवारांचा प्रचार जोमात
पुणे: Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०४ (खराडी-वाघोली) मधील भाजप-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी शनिवारी (ता. १०) क्रांती पार्क येथून पदयात्रेला सुरुवात केली. ही पदयात्रा खराडकर पार्क, राघोबा पाटील नगर मार्गे श्रीकृष्ण सोसायटी येथे समाप्त झाली.
पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील प्रश्न, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ०४ मधील उमेदवार सुरेंद्र बापूसाहेब पठारे, शैलजीत जयवंत बनसोडे, रत्नमाला संदीप सातव व तृप्ती संतोष भरणे सहभागी होते. नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांची नोंद घेत विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सुरेंद्र बापूसाहेब पठारे म्हणाले, “लोकांचा सहभाग हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. नागरिकांच्या अनुभवांवर आधारित विकास आराखडाच प्रभागाला पुढे नेऊ शकतो.”
शैलजीत जयवंत बनसोडे यांनी सांगितले, “पदयात्रांमधून होणारा थेट संवाद विश्वास निर्माण करतो. हा विश्वास कृतीत उतरवणे हीच आमची जबाबदारी आहे.”
रत्नमाला संदीप सातव म्हणाल्या, “महिला, कुटुंब आणि समाज यांना समान संधी देणारा विकास घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
तृप्ती संतोष भरणे यांनी नमूद केले, “युवकांचा सहभाग आणि स्थानिक प्रश्नांची अचूक समज यावर आधारित निर्णयच प्रभागाला योग्य दिशा देतील.”
भाजपा-आरपीआय महायुतीच्या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभताना पाहायला मिळत आहे. या प्रभागातील भाजप-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या पदयात्रेबाबत निवडणुकीच्या वर्तुळात सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.
