Pune Crime News | गणेश बिडकर यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न; वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले असताना भाजप उमेदवारांबाबतची मंगळवार पेठेतील वजनकाटा येथील घटना
पुणे : Pune Crime News | वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी गेले असताना गर्दीचा फायदा घेऊन भाजपचे प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करुन गोंधळ घालण्यात आला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आदित्य दीपक कांबळे (वय २४, रा. सदानंदनगर, सलोखा मंडळाजवळ, मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदिप कांबळे, भरत शिंदे, सागर कांबळे (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवार पेठेतील वजन काटा येथे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र असे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर हे निलेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थांबले होते. सायंकाळच्या वेळी भाजपचे कार्यकर्ते आणि आर पी आयचे कार्यकर्ते हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकाच वेळी आल्याने तेथे खूप गर्दी झाली होती. यावेळी आपले आरक्षण यांच्यामुळे गेले असा समज करुन घेऊन प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपचे सर्व उमेदवार पाहून निनाद धेंडे व इतरांनी उमेदवाराकडे पाहून चोर साले, असे म्हणून अश्लिल शिवीगाळ केली. सागर कांबळे याने गणेश बिडकर यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे गोंधळ निर्माण झाला. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करुन त्यांना बाजूला केले. पोलिसांनी गर्दी, मारामारीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले तपास करीत आहेत.
