Pune Crime News | एमआयटीच्या आळंदीतील इंजिनिअरींग कॉलेजच्या वेबसाईडचा सुपर अ‍ॅडमीन पासवर्ड बदलून सिस्टीम पाडली बंद;  पगार न वाढविल्याने सर्व्हिस बंद करणार्‍या सिस्टम प्रशासकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Super admin of MIT's Alandi Engineering College website shuts down system by changing password; Case registered against system administrator who shuts down service for not increasing salary

पुणे : Pune Crime News | कंपनींमध्ये कामगार आपल्या पगारवाढीसह विविध मागण्यासाठी बंद आंदोलन करुन कंपनीचे काम बंद पाडतात. इंजिनिअरींग कॉलेज मधील आय टी डिपार्टमेंट मधील प्रमुखाने पगारवाढीच्या मागणीसाठी पासवर्ड बदलून संपूर्ण कॉलेजची डिजिटल सिस्टीम बंद पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  आय टी डिपार्टमेंट मध्ये काम करणार्‍या  कर्मचार्‍यांचा पगार वाढवा व गैरहजर असलेल्यांना  ३ महिन्यांचा पगार मिळावा, या कारणावरुन आळंदी येथील एम आय टी अकॅडमी ऑफ  इंजिनिअरींग कॉलेजच्या संगणक व सिस्टम प्रशासकाने कॉलेजच्या वेबसाईडचा सुपर अ‍ॅडमीन पासवर्ड बदलून पूर्ण कॉलेजची डिजिटल सिस्टीम बंद केली आहे.

याप्रकरणी कॉलेजच्या वतीने कार्यवाही  संचालक महेश देवेंद्र गौडा (वय ६०, रा. क्रिसालीस सोसायटी, वाघोली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मिलिंद गोविंद असमार Milind Govind Asmar (वय ५७, रा. प्रथमेश अपार्टमेंट, शिवतीर्थनगर, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आळंदीतील देहुफाटा येथील एम आय टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरींग कॉलेज येथे ९ जानेवारी सकाळी १० वाजल्यापासून घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद असमार हे एम आय टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक व सिस्टम प्रशासक म्हणून काम करतात. त्यांचा व आय टी डिपार्टमेंट मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार वाढवा, असा अर्ज त्यांनी कॉलेजच्या प्रशासनाला दिला होता. परंतु, त्यांच्या मागण्या कॉलेजने मान्य केल्या नाहीत. त्या रागातून ते गेली ३ महिने गैरहजर असल्याने कॉलेजने त्यांचा ३ महिन्यांचा पगार दिला नाही. त्या रागातून त्यांनी ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कॉलेजची वेबसाईडचा सुपर अ‍ॅडमीन पासवर्ड कॉलेजच्या वरिष्ठ प्रशासनाची परवानगी न घेता बदलला. त्यामुळे संपूर्ण कॉलेजची डिजिटल सिस्टीम बंद पडली. तसेच स्लीम सॉफ्टवेअरचा पासवर्डमध्ये बदल करुन त्यांची सर्व्हिस बंद केली. त्यामुळे कॉलेजचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. आरोपीने अ‍ॅप्लीकेशनमध्ये दिलेल्या सर्व मागण्या जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही आणि त्यांचा ३ महिन्यांचा पगार देत नाही, तोपर्यंत कोणतीही सिस्टीम चालू करणार नाही, असे मिलिंद असमार सांगत आहे. शेवटी कॉलेज प्रशासनाने शनिवारी रात्री उशिरा दिघी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

You may have missed