Pune PMC Elections | कोंढव्यात पुणे शहरातील सर्वात मोठे ऑक्सिजन पार्क उभारणार; सुप्रिया सुळे यांची घोषणा, हज हाऊस, मायनॉरिटी वेल्फेअर सेंटर, डीपी रोड, ड्रग्जमुक्त कोंढव्याचे आश्वासन
पुणे : Pune PMC Elections | पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास कोंढव्यात पुणे शहरातील सर्वात मोठे ऑक्सिजन पार्क उभारण्यात येईल. त्याचबरोबर हज हाऊस, मायनॉरिटी वेलफेअर सेंटर, ३ डी पी रोड यांची उभारण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्याचवेळी सुप्रिया सुळे यांनी ड्रग्जमुक्त कोंढवा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे वचन उपस्थितांकडून घेतले.
प्रभाग क्रमांक १९ कोंढवा कौसरबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगरसेविका नंदाताई नारायण लोणकर, परवीन हाजी फिरोज, रईस रशीद सुंडके आणि अँड. हाजी गफुर पठाण यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची कोंढव्यात सभा झाली.
यावेळी नगरसेविका नंदा लोणकर यांनी या प्रभागात केलेल्या विकास कामाची माहिती सुरुवातीला दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी अनेक चांगली कामे हाती घेतली होती. परंतु, विरोधकांनी त्याला विरोध करुन मोडता घातला असल्याचे हाजी गफूर पठाण यांनी सांगितले.
कोंढव्यातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता आम्ही चारही उमेदवार नक्कीच निवडून येऊ असा विश्वास वाटत असल्याचे रईस सुंडके यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यापूर्वी आपण कोंढव्यात ड्रग्जची होळी केली होती. नशेचा हा बाजार सर्वत्र वाढतो आहे. नवी पिढी त्यात बरबाद होऊ लागली आहे. तुम्ही सर्व कोंढवावासीयांनी मला वचन द्यावे की, ड्रग्ज, गांजा, मटकामुक्त, हुक्का पार्लर कोंढव्यातून हद्दपार करु.
कोंढव्यातील जुनी कबरस्थानची जागा अपुरी पडत असल्याने नवी जागा निश्चित करण्यात आली असून तिच्या कामात अडथळे आणण्यात आल्याचे मला सांगण्यात आले. कोंढव्यात नवीन कबरस्थान निर्माण करु हा माझा वादा आहे.
त्याचबरोबर हज हाऊसचे काम अर्धवट राहिले आहे. सरकार शक्तीपीठासाठी ८० हजार कोटी रुपये खर्च करते. मग, हज हाऊससाठी ४ कोटी रुपये देऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यावर हज हाऊससाठी पैसे दिले जातील. येथे मायनॉरिटी वेल्फेअर सेंटर उभारण्यात येईल. त्यामधील तळमजला हा बचत गटांसाठी राखीव ठेवण्यात येईल. बचत गटांना तेथे मोफत स्टॉल लावण्यात येईल. महिलांना विनाव्याज ५ लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल. महिलांना जे प्रशिक्षण पाहिजे ते मोफत दिले जाईल.
पुणे महापालिकेत गेली ७ वर्षे भाजपची सत्ता होती. परंतु, त्यांना साधे फुटपाथ बांधता आले नाही. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना आणली. पण, त्याचा त्यांनी अर्थ लावला की २४ तासात फक्त एकच तास ७ दिवस पाणी. कोंढव्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस हे टँकरराज संपविल्याशिवाय राहणार नाही.

कोंढव्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जे ३ डिपी रोड अजून पेपरच आहेत, ते डी पी रोड आम्ही प्रत्यक्षात आणल्याशिवाय राहणार नाही.
शरद पवार साहेबांनी महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. त्यामुळे आज महिला सत्तेमध्ये सहभागी होऊ शकल्या आहेत.
कोंढवा परिसरात ९ एकरवर पार्क, क्रीडांगण तयार केले जाईल. तसेच ई लर्निंग सेंटरही उभारण्यात येईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
कोंढव्यातील सुप्रिया सुळे यांच्या सभेला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. यावेळी हाजी फिरोज ,हसीना इनामदार , अनिस सुंडके, सोहेल खान अयुब इलाही, इरफान दिल्लीवाले,जावेद भाई, अन्वर मेमन, झाकीर सज्जन , आबिद सय्यद हाजी तैसीफ शेख , सलीम शेख ,अमजद पठाण आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांचे आश्वासन
* सर्वात मोठे ऑक्सिजन पार्क विकसित करणार
* नवीन कबरस्थान उभारणार
मायनॉरिटी वेल्फेअर सेंटर उभारणार, महिलांना मोफत प्रशिक्षण देणार
* हज हाऊससाठी ४ कोटी रुपये देणार
* ई लर्निंग सेंटर सुरु करणार
* ९ एकरमध्ये पार्क आणि क्रीडांगण उभारणार
* प्रस्तावित ३ डी पी रोडची निर्मिती करणार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल आगवान ,जाबीर शेख यांनी केले.
