Maharashtra Weather Alert | मकर संक्रांतीच्या आधीच राज्यावर अवकाळी संकट; कुठं कडाक्याची थंडी, तर कुठं पाऊस
मुंबई : Maharashtra Weather Alert | हिवाळ्याच्या ऐन हंगामात राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहेत. सोमवारी पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापूरमध्ये, मुसळधार पाऊस झाला, तर मुंबई आणि पुण्यातील हवामानातही बदल झाला.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे. सकाळ आणि रात्री हवामान थंड राहील, तर दुपारच्या वाढत्या तापमानामुळे उन्हाचा त्रास जाणवेल. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज असून, पावसाची शक्यता जवळपास नाही. कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पहाटेच्या वेळी काही भागांमध्ये हलके धुके दिसू शकते, परंतु दिवसभर हवामान कोरडे आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे.
सोमवारपासून पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात संध्याकाळी व रात्री जोरदार पाऊस झाला. थंडीच्या ऐन हंगामातील या पावसामुळे एक असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलाचे परिणाम पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही जाणवले असून, तिथेही ढगाळ आकाश आणि थंड हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील एक ते दोन दिवसांत पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
आज राज्यात पावसाची शक्यता मर्यादित असली तरी, ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्यांमुळे हवामानात चढ-उतार सुरू राहतील. हवामान अंदाजानुसार, मुंबई आणि कोकण विभागात सौम्य थंडी आणि दमट हवामान, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी सकाळच्या वेळी गारवा आणि हलक्या सरी, तर मराठवाडा आणि विदर्भात तीव्र थंडीची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानात लक्षणीय बदल अपेक्षित नसला तरी, पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडी कायम राहील, त्यामुळे नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
