Pune Traffic Updates | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस वाहतूकीत बदल ! ईव्हीएम वाटप, मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी ठिकाणच्या वाहतूकीत केला बदल
पुणे : Pune Traffic Updates | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही ठिकाणच्या वाहतूकीत बदल केला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम वाटप, वाहतूक, तसेच मतदान केंद्र व मतमोजणी ठिकाणाच्या परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १४ ते १६ जानेवारी दरम्यान वेगवेगळ्या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
विमानतळ वाहतूक विभागअंतर्गत फिनिक्स मॉलमागील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी विमाननगर चौक, नगर रस्ता या मार्गाचा वापर करावा.
विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत टिळक रस्त्यावरील पूरम चौक, टिळक चौक हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता या मागार्चा वापर करावा.
दत्तवाडी वाहतूक विभागातील ना. सी. फडके चौक (निलायम चित्रपटगृह), तसेच सारसबाग परिसरातील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक या मार्गाचा वापर करावा. टिळक रस्त्याकडे येणारी वाहतूक देशभक्त केशवराव जेधे चौकातून (स्वारगेट) वळविण्यात येईल, असी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
हडपसर विभागातील शिवसेना चौक ते साने गुरूजी मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी अमरधाम, माळवाडी, डीपी रस्ता, हडपसर गाडीतळ या मार्गाचा वापर करावा.
समर्थ वाहतूक विभागातील नेहरू रस्त्यावरील पॉवर हाऊस चौक ते संत कबीर चौक, ए. डी. कॅम्प चौक ते जुना मोटार स्टंंड या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी रास्ता पेठेतील शांताई चौक, क्वार्टर गेटमार्गे इच्छितस्थळी जावे.
कोरेगाव पार्क भागातील नॉर्थ मेन रस्ता, महात्मा गांधी चौक परिसरातील रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी कोरेगाव पार्क मुख्य चौक, एबीसी फार्ममार्गे इच्छितस्थळी जावे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
