Pune Crime News | प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह चौघांना मारहाण; बाबुराव चांदेरे यांना दिला होता पाठिंबा, बाणेरमधील घटना
पुणे : Pune Crime News | प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना धमकाविण्यात आले. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहण केल्याची घटना बाणेर परिसरात घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, रा. धनशीला बंगला, बाणेर ) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी प्रणित प्रमोद निम्हण, प्रणय प्रमोद निम्हण, प्रसन्न रामभाऊ निम्हण, संदीप नामदेव निम्हण, परवेज शेख (सर्व रा़ बाणेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी धनकुडे यांची नणंद सरला बाबुराव चांदेरे यांचे पती बाणेरमधून निवडणूक लढवित आहेत. धनकुडे कुटुंबीयांनी चांदेरे यांना पाठिंबा दिला होता. चांदेरे यांना पाठिंबा दिल्याने निम्हण कुटुंबीय चिडले होते. गुरुवारी १५ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणी बंगल्याच्या परिसरात थांबल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरू असताना आरोपी निम्हण हे धनकुडे यांच्या बंगल्यात शिरले. धनकुडे यांचा मोटारीवरील चालक सचिन उत्तम फासगे याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत फासगे जखमी झाला.
त्यानंतर आरोपींनी कल्याणी यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. कल्याणी यांना वाचविण्यासाठी आलेले नवनाथ देशमुख यांना काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कल्याणी यांची नातेवाईक सायली निलेश शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी तिला धक्काबुक्की केली, तसेच आरोपी प्रणित निम्हण याने ‘निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला बघून घेतो,’ अशी धमकी दिली, असे कल्याणी धनकुडे यांनी म्हटले आहे. कल्याणी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा गर्दी, मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.
