Empress Garden Flower Show 2026 |  एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन 2026 :  ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना यंदाचे पुष्प प्रदर्शन समर्पित

Empress Garden Flower Show 2026 | Empress Garden Flower Show 2026: This year's flower show is dedicated to senior environmentalist Padma Bhushan Dr. Madhav Gadgil

पुणे : Empress Garden Flower Show 2026 | पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत भरणारे हे प्रदर्शन यंदा ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे. अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत सुमन किर्लोस्कर ( अध्यक्ष, प्रदर्शन समिती), सुरेश पिंगळे (उपाध्यक्ष, प्रदर्शन समिती) यांनी दिली . 

उद्घाटन आणि श्रद्धांजली सभाः

प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २३ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार आहे.

डॉ. माधव गाडगीळ हे ‘अॅग्री-हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संस्थेचे मानद सदस्य होते. त्यांच्या निधनाने झालेली हानी भरून न येणारी असून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्घाटनानंतर विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाची मुख्य आकर्षणेः

कलात्मक पुष्परचनाः जपानी पद्धतीच्या (इकेबाना) पुष्परचना आणि विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असतील.

प्रदर्शनाचे औचित्य साधून एम्प्रेस गार्डन विविध पानाफुलानी नटलेली पाहण्याची संधी निसर्गप्रेमी पुष्परसिकांना मिळणार आहे.

राज्यस्तरीय सहभागः पुणे शहरासह कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिक यात सहभागी होणार आहेत.

विविध स्पर्धाः बागप्रेमींसाठी फुलांची मांडणी, फळे-भाजीपाला स्पर्धा आणि आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

विद्यार्थ्यांचा सहभागः मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नुकत्याच झालेल्या चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धेत विविध शाळांतील सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

प्रदर्शनाची वेळ:

। शुक्रवार, २३ जानेवारी । दुपारी १:०० ते सायंकाळी ७:०० । । २४ ते २७ जानेवारी । सकाळी ९:०० ते सायंकाळी ७:०० ।

संस्थेचा उद्देशः

१८३० पासून कार्यरत असलेली ‘अॅग्री-हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ ही संस्था एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन पाहते. केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता, जनमानसात निसर्गाची ओढ आणि पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले जाते.

सर्व निसर्ग आणि पुष्पप्रेमींनी या प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी आणि डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

You may have missed