Dr. Prabha Atre Foundation | रसिकांनी अनुभवले भारतीय कलाविश्र्वाचे वैभव ! स्वरमयी गुरुकुल आयोजित ‘राजकमलच्या संगीतिका’ उपक्रम

Dr. Prabha Atre Foundation | Connoisseurs experienced the glory of Indian art world! ‘Rajkamalchya Sangeetika’ event organized by Swaramayi Gurukul

पुणे : Dr. Prabha Atre Foundation |  भारतीय कलाविश्र्वाचे वैभव असलेले नृत्य, गायन, वादन यांचा परिपूर्ण आणि वैविध्यपूर्ण कलात्मक वापर करत राजकमल स्टुडिओ आणि व्ही. शांताराम यांचा सिनेप्रवास पुणेकर रसिकांसमोर उलगडला. निमित्त होते ‘राजकमलच्या संगीतिका’ या कार्यक्रमाचे.

डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या स्वरमयी गुरुकुलतर्फे ‘सांस्कृतिक ऐवज’या उपक्रमांतर्गत प्रतीकात्मकता आणि आशय यांचे सांगीतिक व कलात्मक सादरीकरण करणारे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने ‘राजकमलच्या संगीतिका’हा विशेष दृकश्राव्य कार्यक्रम स्वरमयी गुरुकुल येथे आयोजित करण्यात आला होता.

संगीताबरोबरच कलाक्षेत्रातील चित्रकला, शिल्पकला, नाटक, चित्रपट, साहित्य अशा विविध क्षेत्रात अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे तसेच कलांचे सादरीकरण स्वरामयी गुरुकुल येथे व्हावे, अशी संकल्पना किराना घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी मांडली होती. याच उद्देशाने ‘सांस्कृतिक ऐवज’या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून या निमित्ताने सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेतला जाणार आहे. या मालिकेतील पहिला कार्यक्रम रविवारी सादर झाला. जागतिक चित्रपटाचे विश्लेषक व ज्येष्ठ अभ्यासक सतीश जकातदार यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. त्यांना तांत्रिक सहाय्य महेश गायकवाड यांनी केले.

डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे व सचिव डॉ. भारती एम. डी. यांच्यासह अनेक सिनेप्रेमी रसिक उपस्थित होते.

अमर भूपाळी चित्रपटातील भूपाळी ‘घनश्याम सुंदरा..’, प्रभातची तुतारी, संत तुकाराम चित्रपटातील ‘आधी बीज एकले’, ‘कशाला उद्याची बात’, ‘मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’, ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’, ‘नारी गं’ तसेच गदिमांनी लिहिलेले सवाल जवाब, ‘सांगा मुकुंद कुणी हा पहिला’, ‘लटपट लटपट लटपट तुझं चालणं’, ‘झनक झनक पायल बाजे’, अरे जा हट नटखट’, ‘आधा है चंद्रमा’, ‘तू छुपी है कहा’, ‘गं साजणी’ आदी गीतांचे यावेळी दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले.

सामाजिक चित्रपटांसह संतपटांमुळे प्रभात स्टुडिओ नावाजलेला होता. येथून शांताराम बापूंचा प्रवास उलगडत वसंत देसाई, राम जोशी, गदिमा, जयराम शिलेदार, संध्या अशा दिग्गजांच्या कारकिर्दीलाही उजाळा देण्यात आला.

नवरंग, राम जोशी, अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे, सैरंध्री, पिंजरा आदी हिंदी-मराठी चित्रपटांच्या निर्मितीची कहाणी, त्यांचे वैशिष्ट्य यावेळी जकातदार यांनी रसिकांसमोर मांडले. लावणी, शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत, अभिजात शास्त्रीय संगीत यांचा रोचक मिलाफ व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांमध्ये बघायला मिळतो. नवरंग सिनेमातील प्रत्येक गाणे आणि त्यातील नृत्य दिग्दर्शन हे त्याचे वैशिष्ट्य ठरले व त्याकाळात विशेष गाजले. त्यांच्या दिग्दर्शनातील बारकावे देखील रसिकांनी जाणले. कार्यक्रमाचा समारोप दो आँखे बारह हाथ या चित्रपटातील ‘ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताने करण्यात आला.

You may have missed