Pune PMC News | महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक 30 जानेवारीपर्यंत सादर होईल; नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी ‘यशदा’ मध्ये कार्यशाळेचे आयोजन

PMC Building

पुणे : Pune PMC News | नवनिर्वाचित नगरसेवकांचा समावेश असलेले महापालिका  सभागृह लवकरच अस्तित्वात येणार आहे. महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक देखिल येत्या ३० जानेवारीपर्यंत सादर करण्यात येईल. रस्त्यांची दुरूस्ती आणि नवीन रस्त्यांचा विकास,  स्वच्छता, पाणी पुरवठा या कामांना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. दरम्यान, महापालिकेचे आगामी अंदाजपत्रक हे १ हजार ५०० कोटी रुपयांचे असेल. शासनाकडून समाविष्ट गावांचा सुमारे २ हजार कोटी जीएसटी तसेच मुद्रांक शुल्क अधिभार व विविध योजनांतील अनुदानाचाही समावेश या अंदाजपत्रकात असेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍यांने दिली.  

महापालिकेचे अंदाजपत्रक सर्व प्रथम महापालिका आयुक्तांकडून तयार करण्यात येते. अगोदरच्या वर्षाचे डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष उत्पन्न, पुढील तीन महिन्यात अर्थात मार्च अखेरीपर्यंत मिळणारे उत्पन्न, शासनाकडून येणारा निधी आदींचा यामध्ये समावेश असतो. नियमानुसार साधारण २० जानेवारीपुर्वी आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक आहे. हे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केल्यानंतर स्थायी समिती ते अंदाजपत्रक अंतिम करून सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली जाते. परंतू यंदा १५ डिसेंबरपासून निवडणुकीची व त्यापुर्वी प्रभाग रचना व मतदार याद्यांच्या कामामुळे महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक विहीत मुदतीत सादर होउ शकले नाही.

यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले निवडणुकीमुळे अंदाजपत्रकाला अंंतिम रुप देता आले नाही. परंतू येत्या ३० जानेवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर करण्यात येईल. सायकल स्पर्धेनिमित्त शहरातील काही रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे झाली आहेत. तसेच सुमारे दोन हजार चेंबर्स समपातळीत करण्यात आले आहे. पुढील वर्षभरात शहरातील सर्व रस्ते दुरूस्तीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच सुमारे ४० हजार चेंबर्सही समपातळीमध्ये करण्याचे काम केले जाणार आहे. काही ठिकाणी पावसाळी गटारांचे चेंबर्स हे समपातळीत करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. शहर स्वच्छ राहील तसेच सर्व कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीचे प्रकल्प कार्यन्वीत करण्याचे उद्दीष्ट राहील.

मिशन परिवर्तन

शहरातील सुस्थितीतील रस्ते, रस्त्यावरील सुरक्षितता, स्वच्छता, अतिक्रमण या सर्वसामान्यांशी निगडीत विषयांसाठी ‘मिशन परीवर्तन ’ सेल सुरू करण्यात येणार आहे.  या सेलमध्ये महापालिका आयुक्तांसह, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, बीएसएनएल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए अशा विविध विभागांच्या अधिकार्‍यांचा समावेश असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त राम यांनी दिली.

नवनियुक्त नगरसेवकांसाठी यशदा मध्ये कार्यशाळा

नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी यशदामध्ये एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. महापालिका अधिनियम, विविध समित्यांचे कामकाज, सर्वसाधारण सभेचे कामकाज, अंदाजपत्रक आदी विषयांवर या नगरसेकांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. सभागृहामध्ये नवीन नगरसेवकांची संख्या अधिक आहे. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांना कुठल्याही अडथळ्यांशिवाय काम करण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.

You may have missed