Pune Crime News | घरात शिरुन मोबाईल चोरणार्‍या अल्पवयीन मुलाला पकडले; रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाकडून चार मोबाईल जप्त

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | मांजरी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहणार्‍या बांधकाम मजुराचा मोबाईल चोरणार्‍या अल्पवयीन मुलाला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा अल्पवयीन मुलगा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून ४ मोबाईल जप्त केले आहेत.

याबाबत अरविंदकुमार (वय २२, सध्या रा. मांजरी खुर्द, मूळ रा. उत्तर प्रदेश) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदकुमार बांधकाम मजूर आहे. मांजरी परिसरातील एका गृहप्रकल्पावर तो राहायला आहे. सोमवारी १९ जानेवारी पहाटे चारच्या सुमारास अल्पवयीन गृहप्रकल्पाच्या आवारात शिरला. आवारातील एका खोलीत अरविंदकुमार आणि त्याचा भाऊ झोपले होते. अरविंदकुमार पहाटे चारच्या सुमारास स्वच्छतागृहात गेला. त्याने खोलीचा दरवाजा बाहेरून लावला. खोलीचा दरवाजा उघडून अल्पवयीन आत शिरला. अरविंदकुमार काही वेळानंतर तेथे आला. तेव्हा खोलीत कोणीतरी शिरल्याचे लक्षात आले. अरविंदकुमार आणि त्याचा भावाने अल्पवयीनाला पकडले.

अल्पवयीनाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे ४ मोबाईल सापडले. त्याने हे मोबाईल या लेबर कॅम्पमधून चोरले होते. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करीत आहेत.

You may have missed