Bajaj Pune Grand Tour | बजाज पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या टप्प्याची प्रचंड उत्साहात सुरुवात; टी.सी.एस. ते आकुर्डी घाट-वळण रस्त्यावर नागरिकांची दुतर्फा गर्दी

Bajaj Pune Grand Tour | The first leg of Bajaj Pune Grand Tour begins with great enthusiasm; TCS to Akurdi Ghat-Walan road is crowded with citizens on both sides

उद्घाटनाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची उपस्थिती

पुणे : Bajaj Pune Grand Tour | ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू झालेल्या या टप्प्याची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून औपचारिक सुरूवात झाली. या वेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली.

पहिल्या टप्प्यातील एकूण अंतर ९१.८ किलोमीटर असून हा टप्पा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातील घाट-वळण रस्त्यांवरून जाणारा असल्याने सायकलपटूंना वेग, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्याचा कस लागला. निसर्गरम्य परिसरातून मार्गक्रमण करत माण–अंबवडे गाव कमान–पौड–चाले–नांदगाव–कोळवण–हडशी लेक–जावण–तिकोना पेठ–काले–कडधे–थुगाव–शिवणे–डोणे–सावळे चौक–आढळे बुद्रुक–बेबडओहळ–चंदनवाडी–चांदखेड–कासारसाई–नेरे–मारुंजी–लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे दुपारी सुमारे ४ वाजता या टप्प्याचा समारोप झाला.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने या टप्प्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली होती. स्पर्धा मार्गाची पाहणी करून वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा तसेच आपत्कालीन सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. काही कालावधीसाठी मार्गांवर वाहतूक वळविण्यात येवून आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बंद ठेवण्यात आले होते. पोलिस प्रशासनासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी संपूर्ण मार्गावर तैनात होते.

स्पर्धा सुरू असतानाच घाट-वळणाच्या रस्त्यांवर सायकलपटू वेग आणि क्षमतेचा सुरेख मिलाफ सादर करताना दिसले. काही ठिकाणी तीव्र वळणे, चढ-उतार व अरुंद रस्ते असल्याने स्पर्धकांसमोर आव्हाने होती; मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू आत्मविश्वासाने हे आव्हान पेलताना दिसून आले. मार्गावरील ठरावीक ठिकाणी वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, तांत्रिक मदत वाहने तसेच रिफ्रेशमेंट पॉइंट्स सज्ज ठेवण्यात आले होते. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोटरसायकल पथकांच्या माध्यमातून सातत्याने स्पर्धा परिसराचे निरीक्षण करण्यात येत होते.

स्पर्धेचा समारोपस्थळी सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विजयी तसेच आघाडीवरील सायकलपटूंनी माध्यमांशी संवाद साधताना मार्गाची रचना, निसर्गसौंदर्य आणि भारतीय प्रेक्षकांचा उत्साह अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली. अनेक परदेशी खेळाडूंनी पुणे जिल्ह्यातील घाटरस्ते हे जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत नोंदविले.

जिल्ह्यातील पर्यटनक्षम स्थळे जागतिक पातळीवर पोहोचावीत, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच तरुणांना क्रीडा व पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्याने आगामी टप्प्यांबाबत सायकलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुणे जिल्ह्याच्या क्रीडा, पर्यटन आणि जागतिक प्रतिमेला नवे परिमाण देणारी ठरत आहे.

क्षणचित्रे

▪️ हिंजवडी परिसरात आयटी क्षेत्रातील युवक-युवतींची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता आणि उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळाला.

▪️ अनेक पालक आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन उपस्थित होते. चिमुकली मुले स्वतःच्या सायकलसह खेळाडूंना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देताना दिसली.

▪️ टी.सी.एस. चौकात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व किल्ल्याची भव्य प्रतिकृती नागरिकांचे विशेष आकर्षण ठरली.

▪️ मोठ्या स्क्रीनवर सुरू असलेल्या थेट प्रक्षेपणासमोर थांबून नागरिकांनी स्पर्धेचा थरार प्रत्यक्ष अनुभवला.

▪️भारतात प्रथमच होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर अधोरेखित होणार असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. ही स्पर्धा दरवर्षी व्हावी, अशी अपेक्षाही अनेकांनी बोलून दाखवली.

▪️जागतिक मानांकनानुसार रस्त्यांची निर्मिती करण्यात आल्याबद्दलही नागरिकांनी समाधान व्यक्त केले. “आजपर्यंत अशा स्पर्धा केवळ दूरचित्रवाणीवर पाहिल्या होत्या; मात्र आज प्रत्यक्ष अनुभवताना विलक्षण थरार जाणवतो,” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रीया युवकांनी दिली.

You may have missed