Pune Crime News | शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची 22 कोटींची फसवणूक; काही मिनिटात दीड लाख नफा दिसल्याने महिन्यांभरात केली मोठी गुंतवणुक

Pune Crime News | Senior citizen cheated of Rs 22 crores with the lure of stock market investment; After seeing a profit of Rs 1.5 lakh in a few minutes, he made a big investment within months

पुणे : Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. सुरुवातीला ५ लाख रुपये गुंतविल्यावर काही मिनिटात त्यावर दीड लाख रुपयांचा अवास्तव नफा दिसला. त्यावर विश्वास ठेवून होती नव्हती ती रक्कम या ज्येष्ठ नागरिकाने गुंतवणूक केली.

याबाबत एका ८५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मूळचे गुरुग्राममधील आहेत. त्यांचा मुलगा आणि सून हे माहिती -तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. ते मगरपट्टा सिटी परिसरात राहायला आहे. आजारपणाच्या उपचारासाठी ते  गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या मुलाकडे आले आहेत. ते इंडस्ट्रियल मशीन टेक्निकल कन्सल्टन्सीचे काम करत होते. तेथून ते निवृत्त झाले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी सुरुवातीला त्यांनी ५ लाख रुपये गुंतविले. 

काही वेळाने त्यांनी रजिस्ट्रेशन केलेल्या मावेरिक्स शेअर ब्रोकर्स या खात्यात नफ्यासह ६ लाख ५० हजार रुपये दिसू लागले. त्यांच्या संपर्कात असलेल्या लिऑनने हे पैसे तुमचेच असून तुमच्याशिवाय दुसरे कोणी हे खाते पाहू शकत नाही, असे सांगितले. त्यांना प्रॉफिट पाहण्यासाठी लिंक पाठविल्या. त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी २७ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या काळात वेळोवेळी स्वत:च्या व पत्नीच्या खात्यातून त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या ६ बँक खात्यात एकूण २२ कोटी ३ लाख २२ हजार ७४२ रुपये शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतविले.

त्यांनी रजिस्ट्रेशन केलेल्या मावेसिक्स शेअर ब्रोकर्सवर त्यांना प्रॉफिटसह ४५ कोटी रुपये दिसत होते. त्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना पैसे काढता आले नाही. त्यांच्या संपर्कात असलेल्या लिऑन, अर्णब ठाकर यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी तुमची प्रॉफिटची रक्कम खूप जास्त आहे. तुम्हाला आणखी ४ कोटी रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यांनी माझ्या प्रॉफिटमधून टॅक्स कपात करुन घेऊन बाकीची रक्कम पाठवा, असे सांगितले. त्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, १७ जानेवारीनंतर त्यांचे लॉगिनही झाले नाही. त्यांना काही एक प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा त्यांना आपली ऑनलाईन फसवणुक झाल्याचे लक्षात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

You may have missed