Pune Crime News | ससूनमधील आयसीयूतून बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी गेला पळून
पुणे : Pune Crime News | फिट येत असल्याने येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला डॉक्टरांनी आयसीयुमध्ये दाखल केले होते. आयसीयुबाहेर असलेल्या पोलीस बंदोबस्ताला चुकवून हातातील बेडी काढून गुन्हेगार पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सनी गौतम कुचेकर Sunny Gautam Kuchekar (वय २६, रा. मुगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार जयराम नारायण सावळकर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ससून रुग्णालयातील दुसर्या मजल्यावरील एम आयसीयु वार्डात १९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी कुचेकर याच्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात त्याला अंबरनाथ येथून डिसेंबर २०२५ मध्ये अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. येरवडा कारागृहात असताना त्याला फीट येऊ लागली. त्यामुळे कारागृहातून सनी कुचेकर याला १६ जानेवारी रोजी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला रविवारी एम आय सीयु वार्डात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्याच्या हातात बेडी लावून ती खाटेला लावण्यात आली होती.
बंदोबस्तावरील पोलीस बाहेर पहारा देत होते. सोमवारी त्याला परिचारिकेने इंजेक्शन दिले होते. यावेळी त्याला बरे वाटल्याने त्याने गुपचुप बेडीतून हात काढला. तेथून तो स्वच्छतागृहात गेला. त्याचा काचा काढून इमारतीला रंगकाम करण्यासाठी लावलेल्या सांगड्यावरुन उतरुन पळून गेला. सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. काही वेळाने परिचारिकेला बेडवर रुग्ण नसून त्याला लावलेली बेडी तशीच असल्याचे दिसून आले. त्यांनी बाहेर असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस उपनिरीक्षक खेडकर यांनी ससून रुग्णालयाला भेट दिली.
सनी कुचेकर याला फिट येते. तो पळून गेला असला तरी त्याला वाटेत कोठे फिट आली तर ते त्याच्या प्रकृतीच्या दृष्टीने गंभीर आहे, असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक खेडकर तपास करीत आहेत.
