Pune Crime News | अपघातानंतर वादातून इराणी महिला कारचालिकेने तरुणाला नेले 2 किमी फरफटत; लक्ष्मीनगर पोलिसांनी कारचालक महिलेला केली अटक (Video)
पुणे : Pune Crime News | संगमवाडी ते सादलबाबा दर्गा दरम्यान रोडवर दोन कार एकमेकांना घासल्या गेल्या. तरुण दुसर्या कारला अडविण्यासाठी तिच्यासमोर उभा राहिला. तेव्हा महिला कारचालकाने त्याच्या अंगावर कार घातली. तेव्हा हा तरुण बोनेटवर पडला. त्याला या महिला कारचालकाने जवळपास २ किमी फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मीनगर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
मेरसेदे रसुलीफर (वय ४५, रा. बाणेर) असे या इराणी महिलेचे नाव आहे.
या घटनेत रामस्वरुप लक्ष्मण राठोड (वय २५, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक, धायरी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला जखम झाली असून डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना सादलबाबा दर्गा रोडवर १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामस्वरुप राठोड व महिला हे आपल्या कारमधून येरवड्यातील सादलबाबा दर्गा रोडने संगमवाडीकडे जात होते. त्यावेळी या दोन कारचालकांमध्ये किरकोळ अपघातावरुन वाद झाला. राठोड यांनी आपली कार महिलेच्या कारला आडवी लावून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. ही महिला पळून जाऊ नये म्हणून तिच्या कारच्या समोर जाऊन उभे राहिले. तेव्हा या महिलेने कार त्यांच्या अंगावर घातली. तेव्हा त्यांनी बोनेटला पकडले. राठोड बोनेटवर चढल्यावरही या महिलेने कार तशीच वेगाने पुढे घेऊन जाऊ लागल्या. हे पाहून बाजूचे लोक या कारचा पाठलाग करु लागले.
काहींनी त्याचे व्हिडिओ शुटींग सुरु केले. जवळपास २ किमी राठोड यांना फरफटत नेल्यावर या महिलेने अचानक ब्रेक दाबला. त्याबरोबर राठोड हे रस्त्यावर पडले. त्यानंतर ही महिला तेथून पळून गेली. यावेळी त्या परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी राठोड यांना रुग्णालयात नेले. त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावरुन पोलिसांनी कारचा शोध घेऊन महिलेला अटक केली. न्यायालयाने अधिक तपासासाठी या महिलेला एक दिवस पोलीस कोठडी दिली होती, असे लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले.
