Pune Crime News | डेटिंग अॅपवरील ओळखीतून तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडणाऱ्या चौघांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद, 3 गुन्हे उघडकीस
पुणे : Pune Crime News | डेटिंग अॅपवर झालेल्या ओळखीतून तरुणाला बोलावून त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन ऑनलाईन पैसे घेऊन अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेणार्या चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
राहील अकिल शेख Raheel Akil Shaikh (वय १९, रा. सोमजी डी मार्ट पाठीमागे, कोंढवा), शाहिद शानुर मोमीन Shahid Shanoor Momin (वय २५, रा. संतोषनगर, कात्रज), रोहन नईम शेख Rohan Naeem Shaikh (वय १९, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा), ईशान निसार शेख Ishaan Nisar Shaikh (वय २५, रा. अंजनीनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चौघांनी अशाच पद्धतीने आणखी दोघा तरुणांना लुबाडल्याचे ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
याबाबत वाघोली येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण हा जेंडर नावाचे समलिंगी डेटिंग अॅप पहात असताना टॉप नावाच्या आयडीवरुन त्यांना एक मेसेज आला. त्यांचे बोलणे झाले. त्यांना कोंढव्यातील कौसरबाग येथील ममता स्वीटस या दुकानाजवळ बोलावले. ते २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तेथे पोहचले. त्यानंतर त्यांना कच्च्या रोडने आतमध्ये येण्यास सांगितले. काही अंतर गेल्यावर त्यांनी गाडी पार्क केली. काही वेळात एक जण आला. पाठोपाठ तिघे जण आले. त्यांनी मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यांच्या खात्यात पैसे नव्हते. त्यांना लोकांकडून पैसे मागविण्यास सांगितले. त्यांनी आईकडून व मित्राकडून आणि मामाकडून एकूण १० हजार रुपये मागवून घेतले. हे पैसे त्यांनी स्वत:कडे ट्रान्सफर करुन घेतले. त्यांच्याकडील हिर्याचा स्टड, मोबाईल फोन, हेडफोन, चांदीचे ब्रेसलेट, चांदीच्या बाळ्या, चांदीची चैन असा ४५ हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. २८ डिसेंबर रोजी घटना घडली होती. पण, त्यांनी घाबरुन पोलिसांकडे तक्रार केली नव्हती.
हा गुन्हा पचल्याने या चौघांचा धीर आणखी वाढला. एक ३२ वर्षाचे तरुण ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी दुचाकीवरुन जात होते. वाटेत कौसरबाग येथे लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी या चौघांनी त्यांना जमिनीवर खाली पाडले. त्यांच्याकडील मोबाईल हिसकावुन घेतला. त्यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडे फक्त एक हजार रुपये होते. त्यांना पैसे मागविण्यास सांगितले. मागिवलेले १० हजार रुपये व मोबाईल असा ३० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावुन घेतला होता. या तरुणानेही पोलिसांकडे तक्रार केली नाही. त्यामुळे या चौघांचा आत्मविश्वास आणखी वाढला.
त्यानंतर त्यांनी डेटिंग अॅप पाहणार्या वाघोली येथील २७ वर्षाच्या तरुणाला ११ जानेवारी रोजी शितल पेट्रोलपंपाजवळ बोलावून घेतले. तेथून त्याला पानसरेनगरमधील भारती वेदांत इंटरनॅशनल स्कुलसमोरील मोकळ्या मैदानात नेले. तेथे आणखी दोघे जण आले. चौघांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन दोघे जण पैसे काढायला गेले. त्यावेळी राहिल व त्याच्या सोबत असलेल्याने त्यांच्या बोटातील २ अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चैन, चांदीची अंगठी काढून घेतले. एटीएममधून १० हजार ५०० रुपये काढून घेऊन दोघे जण आले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन ते चौघे पळून गेले. या तरुणाचा ८० हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. त्यांनी ही बाब चुलत्याला सांगितली. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी २० जानेवारी रोजी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व त्यांच्या सहकार्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलवरुन राहिल शेख याचे नाव निष्पन्न केले. राहिल शेख व त्याच्या इतर तीन साथीदारांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आणखी दोन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्या दोघांना बोलावून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक रवी गावडे तपास करीत आहेत.
