Pune Crime News | मतमोजणी केंद्राच्या सुरक्षा जाळीवर चढणार्‍या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल; आरडाओरडा, गोंधळ करुन आणला होता अडथळा

Pune Crime News | Case registered against Rupali Patil Thombre for climbing over security net of counting centre; created disturbance by shouting and causing chaos

पुणे : Pune Crime News | महापालिका निवडणुकीतील मत मोजणीच्या वेळी बदलेल्या ईव्हीएम मशीन आणल्याबद्दल आक्षेप घेऊन हरकत घेतली.  निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी हरकत फेटाळून लावल्याने तेथील सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरडा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता सुधीर आलुरकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कुलमधील मतमोजणी केंद्रात १६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता घडला होता.

महापालिका निवडणुकीत रुपाली पाटील ठोंबरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक २५ मधून उभ्या होत्या. प्रभागातील मतदान केंद्रावर ज्या ईव्हीएम मशीनवर मतदान झाल्यानंतर निवडणूक प्रतिनिधीकडे त्या ईव्हीएम मशीनचे नंबर देण्यात आले होते. त्यानंतर मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ईव्हीएम मशीनचे नंबर आणि मतमोजणीसाठी आणलेल्या काही ईव्हीएम मशीनचे नंबर हे जुळत नसल्याची हरकत रुपाली पाटील ठोंबरे व या प्रभागातील इतर उमेदवारांनी घेतली होती. त्याबाबत रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्याकडील हरकत अर्जाची पोहोच द्यावी, म्हणून मतदान मोजणी केंद्राच्या अधिकार्‍यांकडे मागणी केली. परंतु, त्यांनी पोहोच दिली नाही. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढल्या. त्यांनी आरडाओरडा करुन घोषणाबाजी केली. त्यांच्या हरकतीवर काहीही होत नसल्याचे पाहून रुपाली पाटील व इतर उमेदवारांनी मतमोजणीवर बहिष्कार टाकून मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच निघून गेले होते.

त्यानंतर आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी निवडणुक प्रक्रियेत व शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. तसेच इतर काही उमेदवार व प्रतिनिधी यांना देखील आरडाओरडा व गोंधळ करुन निवडणुक प्रक्रियेत व शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक तेली तपास करीत आहेत.

You may have missed