Maharashtra Weather Alert | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना पावसाचा इशारा
मुंबई : Maharashtra Weather Alert | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. या हवामान बदलाचा परिणाम राज्यातील सात जिल्ह्यांवर होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वाऱ्यांच्या दिशेत बदल होत असून त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तर आणि पश्चिम भागांवर जाणवू शकतो. यामुळे धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत असून, काही भागांमध्ये उष्णतेत वाढ झाली आहे. कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असून, ढगाळ हवामानामुळे आर्द्रतेचे प्रमाणही वाढू शकते. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम शेतीवर होण्याची शक्यता आहे.
विशेषतः सध्या उभ्या असलेल्या तूर, हरभरा, ज्वारी आणि मका या पिकांवर कीड व अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरण आणि आर्द्रता वाढल्यास रोगराई पसरण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे हवामान बदल 26 जानेवारीपर्यंत कायम राहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
