Empress Garden Flower Show | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन 2026 चे उदघाटन; खाकीसेना हरितसेनेच्या रूपात कार्य करणार – CP अमितेश कुमार
पुण्यातील 44 पोलीस ठाणे ‘ग्रीन पोलीस स्टेशन’ म्हणून पर्यावरणपूरक बनवणार
पुणे : Empress Garden Flower Show | पुण्याच्या ऐतिहासिक वारसाचे प्रतीक असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये यंदाही भव्य पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, पुण्याच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा हिरवागार परिसर असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गसंवर्धन ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे आणि पोलीस विभाग ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल. आज हरित सेनेची गरज आहे, त्यामुळे “खाकीसेना आता हरितसेनेच्या रूपात कार्य करणार” असून शहरातील ४४ पोलीस ठाणे ‘ग्रीन पोलीस स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक पोलीस कर्मचारी सहकार्य करेल, असे मत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आज एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६ चे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ एका संस्थेची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यात योगदान देणे आवश्यक आहे आणि या दिशेने पुणे पोलीस आपली जबाबदारी अत्यंत गांभीर्याने पार पाडेल.
या प्रसंगी अनुपमा बर्बे (जॉइंट सेक्रेटरी), सुमन किर्लोस्कर (अध्यक्ष, प्रदर्शनी समिती), सुरेश पिंगळे (उपाध्यक्ष, प्रदर्शनी समिती) यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यंदा एम्प्रेस गार्डन हे आपल्या अनोख्या व कलात्मक सादरीकरणामुळे नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. प्रदर्शनातील प्रमुख आकर्षणांमध्ये जपानी पद्धतीतील इकेबाना पुष्परचना तसेच विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष यांचा समावेश असून, ते प्रेक्षकांना निसर्गाच्या सूक्ष्म सौंदर्याची अनुभूती देत आहेत.
या प्रदर्शनात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नाशिक तसेच इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी सादर केलेल्या दुर्मिळ व आकर्षक वनस्पतींनी बागकामप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
तसेच बागकामप्रेमींसाठी विशेष गुलाब फुलांची सजावट स्पर्धा, फळ-भाजी स्पर्धा तसेच आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धा, गुलाब पुष्प स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आहे. आयोजकांनी सांगितले की हे पुष्पप्रदर्शन २३ ते २७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
