Pune Crime News | सीम कार्डच्या ‘‘रिचार्ज’’ ने पोलिसांचा तपास झाला ‘चार्ज’; होम व्हिजिटला बोलावून डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना सहकारनगर पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Police investigation into SIM card 'recharge'; Sahakarnagar police arrest two who robbed doctor at knifepoint by calling him for home visit

पुणे : Pune Crime News | आई आजारी असल्याचे सांगून तपासणीसाठी होम व्हिजिटसाठी एका इमारतीमध्ये बोलावून डॉक्टराला चाकूचा धाक दाखवून डॉक्टरांची बी एम डब्ल्यु मोटारसायकल, मोबाईल, चांदीचा जग व रोख रक्कम लुटणार्‍या दोघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषणातून पोलीस या चोरट्यांपर्यंत पोहचले.

गौरंग किरण देसाई Gaurang Kiran Desai (वय २५, रा. राजयोग सोसायटी, कदम प्लाझासमोर, कात्रज) आणि शुभम उमेश शिंदे Shubham Umesh Shinde (वय २८, रा. साईनगर, साळवे गार्डनजवळ, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गौरंग देसाई हा कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. या दोघांनी गुन्हा करण्यासाठी इतर राज्यातील मोबाईल फोन व सीम कार्डचा वापर केला होता. अतिशय सुनियोजित पद्धतीने केलेल्या क्लिस्ट गुन्ह्याची उकल सहकारनगर पोलिसांनी केली आहे.

वैद्यकीय प्रॅक्टीस करणारे डॉक्टर यांना १ जानेवारी २०२६ रोजी एकाने फोन केला. त्यांची आई आजारी असल्याचे सांगून तपासणीसाठी होम व्हीजिट देण्यासाठी त्यांना पुणे सातारा रोडवरील अथर्व फरिहाज इमारतीत बोलावून घेतले. या इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या अंधाराचा गैरफायदा घेऊन डॉक्टरांनी आणलेली बी एम डब्ल्यु मोटारसायकल, मोबाईल, सॅग व त्यात असलेला चांदीचा जग, रोख रक्कम असा ४ लाख ५० हजार रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन नेला होता.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. त्यात डॉक्टरांना कॉल करण्यासाठी त्यांनी बाहेरील राज्यातील मोबाईलचे सीम कार्ड वापरल्याचे दिसून आले. त्यावर फक्त हा एकच कॉल केला असल्याने आरोपींचा मागोवा घेणे अवघड होते. त्यांनी हे सीम कार्ड कोठून रिचार्ज केले, त्याचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावरुन पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. त्यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून बी एम डब्ल्यु मोटार सायकल, एक मोबाईल, रोख रक्कम व चांदीचा जग असा ४ लाख २१ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दाम हुसेन फकीर, सहायक फौजदार बापुसाहेब खुटवड, पोलीस हवालदार अमोल पवार, चंद्रकांत जाधव, किरण कांबळे, निलेश शिवतारे, पोलीस अंमलदार अभिमान बागलाने, किर्तीकर, पदमाळे, भगत, सागर सुतकर, ढोले, मारुती नलवाड, रफिक तडवी, बालाजी केंद्रे यांनी केली आहे.

You may have missed