Pune PMC News | पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे पुणेकरांकडून उत्साहात स्वागत ! पण…इतक्या कमी वेळात आणि कमी खर्चात असे दर्जेदार रस्ते का झाले नाहीत?
प्रशासनाने खुलासा करण्याची सर्वसामान्य पुणेकरांची मागणी
पुणे : Pune PMC News | प्रशासनाच्यावतीने पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित केलेली पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा अत्यंत उत्कृष्ठरित्या पार पडली. शहर आणि जिल्ह्यात मागील पाच दिवसांत पार पडलेल्या या स्पर्धेस पुणेकरांचा विशेषत: युवा वर्गाचा भरघोस पाठींबा मिळाला. परंतू याहूनही उत्तम म्हणजे पावसाळ्यात खड्डयांमुळे चाळण झालेेले रस्ते अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले. यामुळे साहाजिकच पुणेकरांनी प्रशासनाला धन्यवाद तर दिलेच त्याचवेळी यापुर्वी हजारो कोटी रुपये खर्चूनही असे रस्ते का होत नव्हते? असा प्रश्नही उपस्थित केल्याने प्रशासनाची आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे.
पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलींग स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन, दोन्ही महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए , पोलिस असे सर्वच विभाग मागील सहा महिन्यांपासून राबत होते. दोन्ही महापालिका आणि जिल्ह्यातील तब्बल ४५० कि.मी. रस्त्यांचे आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे काम करण्यात आले. यापैकी ७५ कि.मी.चे काम पुणे महापालिकेच्या हद्दीत झाले आहे. यासाठी केवळ १३२ कोटी रुपये खर्च झाले. शुक्रवारी शेवटच्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरून ही शर्यत धावली. ही स्पर्धा पाहाण्यासाठी रस्त्यांच्याकडेल अलोटगर्दी झाली होती. नागरीकांनी घोषणाबाजी करत सायकलस्वारांना पाठींबा दर्शविला.
परंतू यानिमित्ताने नागरिकांनी स्पर्धेमुळे प्रशासनाने केलेल्या रस्त्यांच्या कामाचे कौतुक करताना प्रशासन आणि राज्यकर्त्यांना कानपिचक्या देखिल दिल्या. वाहतुकीची गती वाढविण्यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार महपालिकेने मागील वर्षभरात जवळपास सर्वच रस्त्यांवरील अशास्त्रीय गतिरोधक काढले. स्पर्धेच्या निमित्ताने रस्त्यांच्या कडेला वाहनांना पार्किंगसाठी बंदी घातल्याने रस्ते प्रशस्त वाटत होते. त्याचवेळी पदपथावरील विक्रेत्यांनाही बंदी घातल्याने पादचार्यांना सहजगत्या मार्गक्रमण करता येत होते. यापेक्षाही रस्ते अगदी आंतरराष्ट्रीय रस्त्यांसारखे गुळगुळीत झाले आहेत. एरव्ही खचलेले चेंबर्सही समपातळीत असल्याने वाहतूक कुठल्याही रोधकाशिवाय वेगवान झाल्याची पाहायला मिळाली, या शब्दात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
मात्र तीनच महिन्यांपुर्वी पावसाळ्यात शहरातील जवळपास ९० टक्के रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले होते. महापालिका प्रशासन दरवर्षी सुमारे एक हजार कोटी रुपये रस्त्यांच्या कामावर खर्च करते. यानंतर देखिल पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. नगरसेवक असो अथवा प्रशासकराज रस्त्यांच्या कामांच्या निविदात रिंग तसेच भ्रष्टाचाराच्या बातम्या सातत्याने ऐकायला आणि वाचायला मिळतात. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने प्रशासनाने दर्जेदार काम केले. यापुर्वी ते का गेले नाही ? याचा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. यापुर्वी देखिलल रस्ते करणारे तेच प्रशासन आणि तेच ठेकेदार आहेत. असे असताना पूर्वी रस्त्याची अशी कामे का झाली नाहीत याचेही ऑडीट झाले पाहीजे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
