Pune PMC News | महापालिका कनिष्ठ अभियंता भरतीची परीक्षा पुन्हा एकदा रद्द ! परीक्षेची सुधारीत तारीख लवकरच कळविण्यात येईल
पुणे : Pune PMC News | महापालिकेची २५ जानेवारी रोजी कनिष्ठ अभियंता या पद भरतीसाठी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी दिली आहे. ही परीक्षा रद्द होण्याची ही दुसरी वेळ असल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेने वर्षभरापुर्वी कनिष्ठ अभियंता पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. सुरवातीलाच मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन खटल्यामुळे ही परीक्षा होउ शकली नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका प्रशासनाने पुन्हा आरक्षित जागा प्रमाणीत करून भरतीची सुधारीत जाहीरात काढली. या जाहीरातीनंतर पूर्वीचे आणि नवीन अर्ज केलेल्या परीक्षार्थींची संख्या ४२ हजारांवर पोहोचली.
प्रशासनाने ३ डिसेंबर रोजी राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजनही केले होते. परंतू नेमके २ डिसेंबर रोजी नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने विविध स्तरांतून विद्यार्थ्यांना मतदान करून परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याच विलंब होणार असल्याने विरोध दर्शविण्यात आला होता. यामुळे प्रशासनाने परीक्षा रद्द केली. यानंतर १५ डिसेंबरला महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्याने परीक्षा बारगळली. दरम्यान नुकतेच ही निवडणुक पार पडल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पाचच दिवसांपुर्वी २५ जानेवारी रोजी परीक्षेची घोषणा करण्यात आली. परीक्षार्थींना त्यानुसार प्रवेशपत्रही पाठविण्यात आली. परीक्षा दोनच दिवसांवर असताना आज संध्याकाळी अचानक अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी प्रशासकीय अडचणींमुळे २५ जानेवारीची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे कळविले आहे. परीक्षेची सुधारीत तारीख लवकरच कळविण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
