Mumbai Municipal Corporation Mayor | मुंबई महापौर निवडणुकीची तारीख बदलली?; भाजप-शिवसेना मतभेद चव्हाट्यावर
मुंबई : Mumbai Municipal Corporation Mayor | मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत मोठी राजकीय उलथापालथ समोर आली असून, आधी जाहीर करण्यात आलेली निवडणुकीची तारीख पुढे जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीतील समन्वयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका आयुक्तांकडून महापौर निवडणूक ३१ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर महापौरपदासाठी आरक्षण ‘खुला महिला’ असे जाहीर झाले. मात्र, महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अद्याप एकमत न झाल्याने आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ३१ जानेवारी रोजी होणारी महापौर निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी महायुतीकडे एकूण ११८ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजपचे ८९ तर शिवसेना (शिंदे गट) चे २९ नगरसेवक आहेत. संख्याबळ पाहता महापौर निवडणूक जिंकण्यात अडचण नसतानाही, महापौरपद कोणाकडे जाणार, यावरून दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपकडून अनेक महिला नगरसेविका महापौरपदासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे, तर शिवसेनेकडून अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेतील चर्चा निष्फळ ठरल्याचे संकेत मिळत असून, त्यामुळेच महापौर निवडणुकीची तारीख बदलावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या असून, त्याचा थेट परिणाम निवडणूक प्रक्रियेवर झाला आहे.
दरम्यान, आता महापौरपदाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. महायुतीतील अंतर्गत समन्वय साधला जाईपर्यंत ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच, बहुमत असूनही महापौरपदावरून सुरू असलेला सत्ताधारी पक्षांतील तणाव आणि निर्णयप्रक्रियेतील दिरंगाई यामुळे मुंबई महापालिकेतील राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. महापौरपदावर अखेर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
