Rupali Patil Thombare | “दबावाखाली गुन्हा दाखल केला असेल, तर त्याला मी भीक घालत नाही”; रुपाली ठोंबरे पाटील
पुणे : Rupali Patil Thombare | महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह काही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील उप अभियंता सुधीर आलुरकर (वय ५२) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजता महापालिकेच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी हरकत अर्जाची पोच देण्याची मागणी करत मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षेच्या कारणास्तव उभारण्यात आलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड केल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या इतर काही उमेदवार व प्रतिनिधींनीही गोंधळ घालून परिस्थिती तणावपूर्ण केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक तेली पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, “माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीनंतर मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. अशा गुन्ह्याला मी घाबरत नाही. पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने आत्मपरीक्षण करावे. पोलिसांनी आपली अकार्यक्षमता दाखवली आहे. कोणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला असेल, तर त्याला मी भीक घालत नाही.” या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
