SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तीन दिवसीय पायथन ट्रेनिंगचे आयोजन
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामार्फत सॅमसंग इनोव्हेशन सेंटर व टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पायथन प्रोग्रामिंगवर आधारित तीन दिवसीय ट्रेनिंग/हॅकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचारशक्ती, प्रोग्रामिंग कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता तसेच उद्योगाभिमुख समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. सदर ट्रेनिंग बी.एस्सी. ब्लॉकचेन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असून, पायथन या आधुनिक व उद्योगात व्यापक वापरात असलेल्या प्रोग्रामिंग भाषेचा प्रत्यक्ष कोडिंग अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी पायथन लँग्वेजचा वापर करून विविध तांत्रिक व लॉजिकल समस्यांवर उपाय विकसित करणार आहेत. संघात्मक पद्धतीने काम करताना विद्यार्थ्यांना नवकल्पना, सर्जनशीलता तसेच सहकार्याची कार्यसंस्कृती अनुभवता येणार आहे.
या ट्रेनिंगपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस (एसआयसी) हॅकथॉनच्या सहकार्याने Computational Thinking and Python (C&P) हा उद्योगाभिमुख अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविला होता. या अभ्यासक्रमामध्ये वर्गाधारित अध्यापन, पायथनद्वारे कोडिंग सराव, पेअर प्रोग्रामिंग, पेपर कोडिंग तसेच प्रत्यक्ष उदाहरणांवर आधारित प्रकल्पांचा समावेश होता. यामुळे विद्यार्थ्यांना लॉजिकल थिंकिंग, अल्गोरिदमिक समज, डेटा हाताळणी व प्रोग्रामिंग कौशल्ये अधिक सक्षमपणे आत्मसात करता आली.
या तीन दिवसीय ट्रेनिंगला मार्गदर्शन करण्यासाठी टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लेफ्टनंट जनरल कुलभूषण दवस उपस्थित राहणार असून, ते विद्यार्थ्यांना उद्योगातील संधी, कौशल्यविकासाचे महत्त्व व भविष्यातील करिअर संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
हा उपक्रम उद्योग व विद्यापीठ यांच्यातील प्रभावी सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरत असून, विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रकल्पकार्य व उद्योगसुसंगत करिअरसाठी आवश्यक कौशल्यांची भक्कम पायाभरणी करून देणारा आहे.
