ILS Law College Pune | ‘मूटकोर्ट’मुळे विद्यार्थ्यांमध्ये युक्तिवाद, न्यायालयीन कौशल्य विकसित होतात; न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांचे मत
आयएलएस विधी महाविद्यालयात अप्रत्यक्ष करावर तिसऱ्या राष्ट्रीय मूटकोर्ट स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात
पुणे : ILS Law College Pune | “मूटकोर्ट स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या युक्तिवाद कौशल्याला, कायदेशीर संशोधनाला आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या आकलनाला चालना मिळते. त्यातून भविष्यातील निष्णात वकील, करतज्ज्ञ तयार होतात. महाविद्यालयीन स्तरावर अशा स्पर्धा नियमितपणे व्हाव्यात,” असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी व्यक्त केले.
इंडियन लॉ सोसायटीच्या (आयएलएस) आणि चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स (सीटीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयएलएस विधी महाविद्यालयामध्ये अप्रत्यक्ष करांवर आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय मुटकोर्ट स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच झाली. अप्रत्यक्ष कर कायद्यावर आधारित ही देशातील एकमेव राष्ट्रीय मूटकोर्ट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आयएलएस विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा पातुरकर आणि प्राध्यापिका डॉ. दिव्या मित्तल, ‘सीटीसी’चे माजी अध्यक्ष अॅड. अजय सिंग आणि विद्यार्थी समितीच्या अध्यक्षा सीए नम्रता देढिया आदी उपस्थित होते.
डिसेंबर-जानेवारी महिन्यात झालेल्या प्राथमिक, उपांत्यपूर्व व उपांत्य फेऱ्यांनंतर दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले होते. या दोन्ही संघानी न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि निवृत्त न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या न्यायपीठासमोर आपली बाजू प्रभावीपणे मांडली. पूर्व-जीएसटी उत्पादन शुल्क आदेशांची अंमलबजावणी, कर वर्गीकरण व अधिकार क्षेत्राशी संबंधित गुंतागुंतीच्या कायदेशीर मुद्द्यांचा या युक्तिवादात समावेश होता.
या स्पर्धेत रायपूरच्या हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील (एचएनएलयू) माही अग्रवाल, अनन्या मिश्रा आणि अंबाती नुपूरराव यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले, तर भोपाळच्या नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीच्या (एनएलआययू) साहिल यादव, हिया सक्सेना आणि प्रियम सोनी यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत १० हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले. पाच हजार रुपयांचा सर्वोत्तम मेमोरियल पुरस्कार पुण्यातील सिंबायोसिस विधी महाविद्यालय (मन्नत कौर सोधी, शश्वत शिवम आणि स्नेहा गुप्ता) संघाला मिळाला. सर्वोत्तम वक्ता पुरस्कार तामिळनाडूच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यापीठातील हरिरूपन माथनला, तर गुजरातच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या सिमर घुमनला मिळाला.
या स्पर्धेत अहमदाबाद, भुवनेश्वर, भोपाळ, बंगळुरू, चेन्नई, गांधीनगर, गोवा, हैदराबाद, पुणे, रायपूर, छत्रपती संभाजीनगर, तिरुचिरापल्ली आणि त्रिपुरा येथील नामांकित विधी महाविद्यालयांतील १६ संघांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक व उपांत्य फेऱ्यांचे परीक्षण सीए नरेश शेट्टी, सीए राजीव लुथिया, अॅड. अनिल बलानी आणि अॅड. के. एस. नवीनकुमार यांनी केले. स्पर्धेचे संयोजन सीए नम्रता देढिया, सीए चार्मी शाह व सीए मानसी नगडा, प्रा. डॉ. दिव्या मित्तल आणि प्रा. भूमिका राठोड यांनी केले.
