Pune Animal Liberation | दूध आणि बीफ उद्योगातील दुवा उघड : पुण्यात तरुणांचे प्रभावी आंदोलन*

Pune Animal Liberation | Link between milk and beef industry exposed: Effective youth movement in Pune*

धवल क्रांती की गुलाबी क्रांती? पुणे ॲनिमल लिबरेशनने  उघड केली वस्तुस्थिती

पुणे  : Pune Animal Liberation | प्रजासत्ताक दिनाच्या सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून, पुण्यातील तरुणांनी भारतातील दूध उत्पादन आणि बीफ निर्यात उद्योगातील परस्परसंबंधांवर लक्ष वेधले. पुणे ॲनिमल लिबरेशन या तरुण-नेतृत्वाखालील प्राणीहक्क संघटनेच्या वतीने जे.एम. रोडवरील संभाजी उद्यानात माहितीवर आधारित आणि प्रभावी दृश्य प्रदर्शन सादर करण्यात आले.

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असला तरी, त्याचवेळी तो बीफचा प्रमुख निर्यातदार देश असल्याकडे या प्रदर्शनातून लक्ष वेधण्यात आले. सरकारी व जागतिक आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी २३० दशलक्ष टनांहून अधिक दूध उत्पादन होते, तर सुमारे १.३ दशलक्ष टनांहून अधिक बीफची निर्यात केली जाते. दूध पुरवणारी यंत्रणाच प्रत्यक्षात बीफ पुरवठा साखळीला हातभार लावत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

दूध देण्याची क्षमता कमी झाल्यावर किंवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर न राहिल्यावर जनावरांची विक्री केली जाते आणि त्यांना मांस उद्योगाकडे वळवले जाते. डेअरी उद्योग आणि बीफ व्यापार हे वेगळे नसून एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत, असे या उपक्रमातून मांडण्यात आले.

शहरांमध्ये रस्त्यावर दिसणाऱ्या जखमी, कुपोषित आणि दूध देणे थांबवलेल्या गायी हे याचे सर्वात ठळक उदाहरण असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. पुण्यातील अनेक भागांमध्ये अशा गायी प्लास्टिकसह कचरा खाताना दिसतात, ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात प्राणीहक्क कार्यकर्ते प्रवीण म्हणाले, “दूध देणे बंद झाल्यानंतर रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक गायी जवळच्या डेअरीमधूनच आलेल्या असतात, याची जाणीव बहुतेकांना नसते. दूध आणि मांस उद्योगातील हा दुवा समजून घेण्यासाठी नागरिकांनी ‘माँ का दूध’ हा माहितीपट पाहावा.”

प्राणीहक्क कार्यकर्त्या श्वेता बोरगावकर म्हणाल्या, “दूध आणि मांस उद्योग वेगळे असल्याचा समज आहे. मात्र आकडेवारीनुसार हे एकाच साखळीचे भाग आहेत. जनावरे दुधासाठी उपयोगी न राहिल्यावर त्यांना मांस उद्योगात ढकलले जाते. या वास्तवाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.”

यावेळी बोलताना चेतन शिंदे म्हणाले, “मांस उत्पादनाच्या ‘गुलाबी क्रांती’शिवाय दुग्धोत्पादनातील ‘धवल क्रांती’ शक्य नाही. दुधाची वाढती मागणी अशा जनावरांची निर्मिती करते, ज्यांची जबाबदारी शेवटी कत्तल उद्योगाकडे जाते. या दोन्ही उद्योगांकडे स्वतंत्रपणे पाहणे थांबवण्याची वेळ आली आहे.”

ठाणे, बंगळुरू, जयपूरसह देशातील इतर नऊ शहरांमध्येही गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी अशीच प्रदर्शने आयोजित करण्यात आली असून, डेअरी उद्योग आणि मांस व्यापारातील अतूट संबंधांवरील मौन तोडणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

You may have missed