President’s Police Medal | स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
पुणे : President’s Police Medal | कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
भोर तालुक्यातील तांबाड, गुंजन मावळ येथील शेतकरी कुटुंबातून अविनाश शिळीमकर आले असून त्यांनी एमबीए (पीपीएम)पर्यंत उच्च शिक्षण घेतले आहे.
पोलिस सेवेत ३२ वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या अविनाश शिळीमकर यांनी मुंबई, सातारा, नागपूर, अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी विविध जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करत गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करीत असताना उरुळी कांचन परिसरातील कुख्यात गुन्हेगार अप्पा लोंढे व त्याच्या टोळीला पायबंद घालून गुन्हेगारीला प्रतिबंध केला. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, आंतरराज्यीय टोळ्या, संघटित गुन्हेगारी तसेच ईव्हीएम चोरीसारख्या संवेदनशील प्रकरणांचा छडा लावत त्यांनी कौशल्यपूर्ण तपासाची छाप उमटवली. पुणे ग्रामीण आणि शेजारील जिल्ह्यांतील गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करत अनेक आरोपींना अटक करण्यात आली, तर कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कोरोना काळातही त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक भान जपत कार्य केले. स्थलांतरित मजुरांसाठी मदत, पोलिस कर्मचाºयांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा पुढाकार उल्लेखनीय ठरला. याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखताना संयम, समतोल आणि संवाद कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणल्या. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि प्रभावी कामगिरीमुळे यापूर्वी त्यांना २०२४ मध्ये पोलिस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.
