ZP Elections Pune | महापालिकेतील ‘पानिपता’नंतर अजित पवार यांचे जिल्हा परिषदांसाठी बेरजेच्या राजकारणाचा प्रयत्न यशस्वी होणार का?
पुणे : ZP Elections Pune | राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकांमध्ये विशेषत: पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला़. ते भाजपकडून महापालिका पुन्हा हिसकावुन घेणार असे वातावरण तयार करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश आले होते. परंतु, मतमोजणी झाली, तेव्हा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही ते भुईसपाट झाले. त्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. महापालिकेतील दारुण पराभवानंतर अजित पवार यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी बेरजेचे राजकारण सुरु केले. अगदी बारामतीमध्ये भाजपच्या दोन नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन त्यांना तिकीट दिले आहे. त्याचवेळी नगरपालिका, महापालिकेतील यशामुळे उत्साहीत झालेल्या भाजपने पुणे जिल्ह्यात जोरदार लढत देण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पवार यांचे प्राबल्य असलेल्या पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
गेल्या काही दशकांपासून जिल्हा परिषदेवर अजित पवार यांचे वर्चस्व दिसून येते. शरद पवार यांच्यापासून फुटून सत्ताधारी भाजपबरोबर गेलेल्या अजित पवार यांना प्रथमच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेतील अपयशामुळे अजित पवार यांनी त्यांचे कायम विरोधक राहिलेल्या विरोधकांशी जुळवून घेतले आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे यांच्यात समेट घडवून आणला आहे. प्रचाराचा शुभारंभ करताना अजित पवार यांनी मी आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आलो तर बिघडलं कुठं? आम्ही कायम भांडतच बसायचं का?. तसेच आपण हलक्या कानाचा माणूस नसून आपला व्याप कितीही वाटला असला तरी बारामतीतील प्रत्येक घडामोडीवर आपले बारीक लक्ष असते, असा इशाराही त्यांनी प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत सर्वांना दिला आहे.
आंबेगाव वगळता संपूर्ण जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. आंबेगावात दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या स्थानिक राजकारणामुळे तेथे दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत नाहीत. पण, जिल्ह्यातील आणखीही काही तालुक्यांमध्ये ही आघाडी खरच झाली का असा प्रश्न निर्माण झाला आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आता काहीही आधार राहिला नसल्याचे अजित पवार यांनी बारामती नगरपरिषद निवडणुकीत दाखवून दिले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे सांगितले जात असले तरी बारामतीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नाही.
उलट भाजपच्या दोघांना पक्षात घेऊन तिकीट देण्यात आले. त्यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीच परिस्थिती जुन्नर आणि मावळमध्ये दिसून येत आहे. तेथेही राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला जागा सोडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे तेथेही अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी आता आपला मुलगा, सून, मुलगी यांना उभे केले आहे. ज्यांना बंडखोरी केली आहे. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न कसे होणार, हे मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अधिक स्पष्ट होणार आहे.
अजित पवार यांना पुरंदरमध्ये काँग्रेस आणि खेडमध्ये शिवसेना शिंदे सेनेशी सामना करावा लागणार आहे. अन्य तालुक्यांमध्ये भाजपशी मुख्य लढत असणार आहे. महापालिका निवडणुकीतील यशाने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. त्यात भोरमध्ये संग्राम थोपटे हे भाजपमध्ये आल्याने तेथे भाजपचे पारडे जड झाले आहे. इतर तालुक्यांमध्येही भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे नगर पालिका, महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषद तसेच जास्तीत जास्त पंचायतीं आपल्या ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शरद पवार समर्थक आपल्या तलवारी किती मान्य करतात. हे मंगळवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अधिक स्पष्ट होणार आहे. हे पाहता जिल्ह्यात महापालिकांप्रमाणे राष्ट्रवादी काँंग्रेस आणि भाजप अशी लढत चुरशीची होणार हे नक्कीच.
