Pune Crime News | सोरतापवाडीच्या महिला सरपंचासह चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल; हुंड्यासाठी सुनेचा छळ करुन आत्महत्या करण्यास केले प्रवृत्त
पुणे : Pune Crime News | पुणे -सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावाच्या महिला सरपंच सुनिता चौधरी यांच्यासह त्यांचा पती, दोन मुलांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा हुंड्यासाठी छळ करुन तिला आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा ऊरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दीप्ती रोहन चौधरी (वय ३०, रा. सोपतापवाडी) असे आत्महत्या केलेल्या सुनेचे नाव आहे. सरपंच सुनिता कारभारी चौधरी, पती रोहन कारभारी चौधरी, दीर रोहित कारभारी चौधरी आणि कारभारी चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत दीप्तीच्या आईने ऊरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडीतील कड वस्ती परिसरात महिला सरपंच सुनिता चौधरी राहायला आहे. दीप्तीचा विवाह २०१९ मध्ये रोहन याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी ५० तोळे सोन्याचे दागिने, रोकड दिली होती. विवाहानंतर काही दिवसांतच माहेरून पैसे आणण्याची मागणी सासरकडील मंडळींकडून सुरू झाली होती. वेळोवेळी पैसे देऊनही दीप्तीचा छळ सुरू होता. आरोपींनी दीप्तीला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले होते. हुंडा दिल्यानंतर तिला त्रास देण्यात येत होता. मानसिक दबाव आणि शारीरिक छळ असह्य झाल्याने अखेर दीप्तीने शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे तपास करत आहेत.
