Pune Crime News | चेक बाऊंन्सचा गुन्हा दाखल केल्याने टोळक्याने व्यावसायिकाला मारहाण करुन पार्टनरकडून 2 लाख रुपये घेऊन मोटारसायकल दिली पेटवून; विमानतळ पोलिसांनी दोघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | उधारीवर माल घेऊन धनादेश दिला होता. तो धनादेश बाऊन्स झाल्याने व्यावसायिकाने गुन्हा दाखल केला. त्याचा राग मनात धरुन दोघांनी साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकाला मारहाण करुन त्यांच्या भागीदाराकडून २ लाख रुपये घेऊन मोटारसायकल पेटवून देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत फहिमुद्दीन मुजिबुद्दीन शेख (वय ४४, रा़. मेफेअर एलिगंझा, कोंढवा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हैदर अली शाह (वय ३०) आणि रईस पाशा (वय २५, दोघे रा. कोंढवा) यांना अटक केली असून त्यांच्या ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विमाननगर येथील संजय पार्क रिवा सोसायटीचे समोर २५ जानेवारी रोजी मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदर अली शाह याने यापूर्वी फिर्यादी शेख यांच्याकडून पीओपी करीता लागणारे जिप्समचे ७ लाख ७८ हजार रुपयांचे मटेरिअल उधार घेतले होते. त्याचे पैसे न देता त्यांना बँकेचा धनादेश दिला होता. तो बाऊन्स झाल्याने फिर्यादी यांनी त्यांचे विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याचा राग हैदर अली शाह यांना होता. फिर्यादी व त्यांचे पार्टनर रोझलिन यांच्यासोबत २५ जानेवारी रोजी मध्यरात्री मोटारसायकलवरुन जात होते. विमाननगरमधील संजय पार्क समोर हैदर शाह व त्यांच्या साथीदारांना त्यांना अडविले. शेख यांना भिती दाखविण्यासाठी व मारण्याच्या उद्देशाने हत्यार दाखविले. त्यांना मारहाण केली. फिर्यादीचे पार्टनर रोझलिन यांच्याकडून २ लाख रुपये व पर्स जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांची मोटारसायकल पेटवून देऊन नुकसान केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.
