Surendra Pathare Foundation | सहा वर्षांचा सेवायज्ञ; सुरेंद्र पठारे फाऊंडेशनकडून प्रजासत्ताक दिनी रक्तदान महाशिबीरातून माणुसकीचा संदेश
खराडी, पुणे: Surendra Pathare Foundation | रक्तदान सामाजिक जबाबदारी सोबतच राष्ट्रसेवेचीच एक महत्त्वाची कडी आहे. एका रक्तदात्यामुळे तीन गरजूंचे प्राण वाचू शकतात, ही जाणीव ठेवून आम्ही सातत्याने हे महाशिबीर आयोजित करत आहोत आणि यंदाचे हे ६ वे वर्ष आहे,” असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच पुणे महापालिका नगरसेवक सुरेंद्र पठारे यांनी रक्तदान महाशिबीरादरम्यान व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित रक्तदान महाशिबीर उत्साहात पार पडले. या महाशिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यंदा ३२८७ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतल्यास २०२१ साली १६४४, २०२२ साली ३४५३, २०२३ साली ३५९३, २०२४ साली ३६७१ व २०२५ साली ३४६५ अशा एकूण १५,८२६ रक्तपिशव्यांचे संकलन या महाशिबिराच्या माध्यमातून झाले होते. शहरात व परिसरात भासणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरत आहे.
वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी दरवर्षीप्रमाणे रक्तदान महाशिबीराचे उद्घाटन केले तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदनही पार पडले. त्यांनी रक्तदात्यांचे विशेष कौतुक करत, “समाजाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी अशा उपक्रमांची गरज कायम आहे,” असे मत व्यक्त केले.
महाशिबीरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
मान्यवरांनी रक्तदात्यांना प्रोत्साहन देत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
शिबीराबाबत बोलताना पुणे महापालिकेच्या नगरसेविका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे म्हणाल्या, “रक्तदानाच्या माध्यमातून माणुसकी जपण्याचे काम हे फाऊंडेशन सातत्याने करत आहे. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने या उपक्रमाची ताकद वाढते. समाजाच्या आरोग्यासाठी असे उपक्रम पुढेही अधिक व्यापक स्वरूपात राबवणार आहोत.”
महाशिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक व फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून आगामी काळातही हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी फाऊंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
